(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 च्या कामामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सज्ज
मेट्रो-3 च्या प्रत्येक स्थानकामध्ये पावसादरम्यान साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मान्सून दरम्यान बांधकाम स्थळी साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
मुंबई : मान्सून काळात मेट्रो कामामुळे मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सज्ज आहे. मुंबई मेट्रो 3 च्या सर्व अभियंता तसेच कंत्राटदारांना येत्या मान्सून दरम्यान करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत. मेट्रो 3 च्या कामामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
मुंबई मेट्रो-3 च्या सर्व पॅकेजचे अधिकारी व मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी मुंबई मेट्रो 3 च्या बांधकाम स्थळांना संयुक्त भेटी दिल्या आणि मान्सूनपूर्व कराव्या लागणाऱ्या कामांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अभियंत्यांनी आणि कंत्राटदारांनी मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केली आहे. सर्व कामे प्रगतीपथावर असून पावसाळा सुरु होण्यापूर्वी ती कामे पूर्ण होतील. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ करणे, त्यातील गाळ काढणे तसेच कॅच पिट्स बांधणे अशी कामे प्रगतीपथावर आहेत.
याशिवाय पावसाळ्यात वाहतुकीमध्ये अडथळा येऊ नये यासाठी दिशादर्शकांची पुन्हा रंगरंगोटी करणे, बॅरिकेड्स स्वच्छ करून दृष्यमानता वाढवणे, कामाच्या आजूबाजूचे रस्ते सुस्थितीत ठेवणे यासारखी कामे युध्द पातळीवर चालू असून 31 मे 2019 पर्यंत ती पूर्ण होतील.
"मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मुंबई शहरासाठी एक महत्त्वपूर्ण वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी कार्यरत आहे. मेट्रो 3 च्या बांधकामामुळे मुंबईकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. मुंबईतील सखल भागात सर्व प्रकारची आपत्कालीन उपकरणे आणि वाहने उपस्थित राहतील. ज्यामुळे वाहतूक किंवा पाणी तुंबण्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही”, अशी माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली.
मेट्रो-3 च्या प्रत्येक स्थानकामध्ये पावसादरम्यान साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मान्सून दरम्यान विद्युतीय व संचार व्यवस्था कायम राखण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन इतर यंत्रणाशी समन्वय साधेल. बांधकाम स्थळावर जमा होणारा मलब्याचा निचरा टारपोलिनने झाकलेल्या डंपर्सद्वारे करण्यात येणार आहे.
मान्सून दरम्यान बांधकाम स्थळी साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. दोन अभियंते व पर्यवेक्षक असलेला आपत्कालीन प्रतिसाद चमू प्रत्येक बांधकाम स्थळावर 24 तास तैनात राहील. याशिवाय मुंबई महानगरपालिकेचे स्थानिक कार्यालय आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी दररोज समन्वय साधला जाईल. मान्सून संबंधी तक्रारी नोंदविण्याकरिता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावर दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करण्यात येईल.