Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो 3 वरील 11 स्थानकांची नावं बदलली, केंद्राची मंजुरी, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Mumbai Development News : मुंबई मेट्रो 3 या प्रकल्पातील 11 स्थानकांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला गेला आहे. केंद्र सरकारनं याला मान्यता दिली आहे.
मुंबई : केंद्र सरकारनं मुंबईतील मेट्रो 3 या प्रकल्पातील 11 स्थानकांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्प हा भूमिगत मेट्रोचा आहे. कुलाबा-वांद्रे आणि सीप्झ यांना या मेट्रोनं जोडलं जाणार आहे. या मार्गावर एकूण 27 स्थानकं असून त्यापैकी 11 स्थानकांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे.
मुंबई मेट्रो 3 अॅक्वा लाइनचं अंतर 33.5 किलोमीटरचं आहे. या मार्गावर एकूण 27 स्थानकं आहेत. या मार्गावरील काही स्थानकांदरम्यानचं काम पूर्ण होत आलेलं आहे. आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या दरम्यानचं काम पूर्ण होत आलेलं आहे. पुढील आठवड्यात नरेंद्र मोदी मुंबईत उपस्थित राहून या मार्गावरील मेट्रो सेवेची सुरुवात करणार आहेत. ऑक्टोबर 3 किंवा ऑक्टोबर 5 दरम्यान हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो 3 आरे ते बीकेसी अंतर 12.5 किमी आहे. या दरम्यान 10 स्थानकं आहेत. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी कामाची पाहणी केली असून त्यासंदर्भातील प्रमाणपत्र अद्याप मिळालेलं नाही.
कोणत्या स्थानकांची नावं बदलली?
2013 च्या नोटिफिकेशननुसार मेट्रो स्थानकांची जी नावं होती त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.सीएसटी मेट्रो स्थानकाचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो असं असेल. मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकाचं नाव जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो, सायन्स म्यूझियमचं नाव सायन्स सेंटर, शितलादेवी टेम्पलचं नाव शितला देवी मंदिर, विद्यानगरी स्थानकाचं नाव वांद्रे कॉलनी, सांताक्रुझ स्थानकाचं नाव सांताक्रुझ मेट्रो असं करण्यात आलं आहे.
डोमेस्टिक एअरपोर्ट स्थानकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1, सहार रोड स्थानकाचं नाव सहार रोड करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2, एमआयडीसीचं नाव एमआयडीसी अंधेरी आणि आरे स्थानकाचं नाव आरे जेवीएलआर असं करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबईतील मेट्रो मार्गांचं जाळं वाढत आहे. मुंबई मेट्रो 3 मार्गाचं कारशेड आरे मध्ये करण्यात आलं आहे. ठाकरे सरकारच्या काळात कारशेड कांजूर मार्गला करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर पुन्हा कारशेड आरेमध्येच होईल हे निश्चित करण्यात आलं. त्यानुसार प्रकल्पाचं काम सुरु आहे.
इतर बातम्या :
सरकारचं ठरलं! लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार
एकेकाळी गरीबांच्या यादीत होता देश; आता श्रीमंतांच्या श्रेणीत, देशातील बहुतेक लोक करोडपती