एक्स्प्लोर
मु. पो. राणीची बाग, मुंबईच्या महापौरांचा नव्या बंगल्यात प्रवेश
मुंबईतील प्रसिद्ध अशी राणीची बाग अर्थात जिजामाता उद्यान. या ठिकाणी झाडाझुडपात लपलेल्या टुमदार बंगल्यात आज महापौरांनी गणेशपूजा करुन गृहप्रवेश केला.

मुंबई : शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यातील मुक्काम संपवून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आजपासून राणीबागेतील नवीन बंगल्यात राहायला आले आहेत. दादरमधील शिवाजी पार्कच्या बंगल्याच्या जागेत आता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होतं आहे. त्यामुळे, आता महापौरांचं वास्तव्य भायखळ्यातल्या जिजामाता उद्यानातील नव्या बंगल्यात असणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशी राणीची बाग अर्थात जिजामाता उद्यान. या ठिकाणी झाडाझुडपात लपलेल्या टुमदार बंगल्यात आज महापौरांनी गणेशपूजा करुन गृहप्रवेश केला. हा बंगला ब्रिटीशकालिन म्हणजे बराच जुना आहे. या बंगल्याची संपूर्ण डागडुजी होण्याआधी हा बंगला महापौरपदाला साजेसा आहे का? याबाबत प्रश्न विचारले गेले. तसंच, राणीबागेतल्या प्राणीपक्षांनाही महापौरांचा नवा शेजार मानवणार का हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे महापौर बंगल्यासाठी दुसऱ्या जागेची चाचपणीही सुरु झाली. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आता महापौर बंगल्याचा पत्ता हा दादर शिवाजी पार्क नाही तर भायखळा राणी बाग आहे. कसा आहे नवा महापौर बंगला? *राणीबागेतील बंगला* राणीबागेतला हा बंगला 1931 साली बांधला आहे. ब्रिटीशांनी मौजमजेसाठी, पार्टीसाठी या बंगल्याचा वापर कॅफेटेरिया म्हणून केला होता. त्या उद्देशानेच हा बंगला बांधण्यात आला. 1974 पासून हा बंगला महापालिकेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निवासस्थान बनला. या बंगल्यात याआधी माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त असिम गुप्ता यांचं वास्तव्य होतं. सध्या इथे महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड राहतात बंगल्याच्या परिसराचं एकूण क्षेत्रफळ 17 हजार चौरस फूट इतकं आहे. तर बंगल्याचं बांधकाम 6 हजार चौरस फूट जागेवर आहे. बंगल्यात खाली चार, वरच्या मजल्यावर चार अशा एकूण आठ खोल्या आणि दोन हॉल (सभागृह) आहेत. *शिवाजी पार्क बंगला* 40 हजार चौरस फूट क्षेत्रफळ - मलाड स्टोन - मालाडमधल्या खदानीतून आणलेल्या दगडापासून बनवलेला बंगला - हेरिटेज ग्रेड 2 प्रॉपर्टी, आलिशान ग्राऊंड प्लस वन वास्तू, मागे समुद्रकिनारा, बंगल्याबाहेर विस्तीर्ण मोकळा प्रदेश, अद्ययावत सुरक्षायंत्रणा, मोठे प्रवेशद्वारवरच्या मजल्यावर तीन दालन महापौरांचं 2 बेड रुम्स निवासस्थान, एक अभ्यंगताच्या बैठकीची खोली. तळ मजल्यावर कॉन्फरन्स रुम, पोचखाना (हॉल), अभ्यंगताची खोली उजव्या बाजूला लिफ्ट आहे राजस्थानी जोधपुरी बनावट 38 नारळाची झाडं आणि प्रशस्त बाग आहे. गुलमोहर, पारिजात, वड आणि आंब्याची झाडं आहेत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, अमिताभ बच्चन सारख्या दिग्ग्जांचा सहवास लाभलेली वास्तू शिवसेना आणि भाजपच्या अनेक महत्वाच्या बैठकी या वास्तुत पार पडल्या. त्याचबरोबर शिवसेनेच्या अंतर्गत आणि अतिशय वादळी बैठकी पार पडल्या. त्यामुळे या वास्तूला एक वेगळं राजकीय महत्व आहे. राणीबागेतील महापौर निवासासाठी निश्चित केलेली जागा फारच लहान आहे. विशेष म्हणजे राणीबाग हे शांतता क्षेत्रात येते. महापौरांकडे कायम देशी-परदेशी पाहुण्यांची वर्दळ असते. तसंच त्याठिकाणी कार्यक्रमही केले जातात. मात्र, आता महापौरांचा नवा शेजार राणीबागेला खरंच मानवतोय का हे पाहावं लागेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























