मुंबईत केवळ 37 ठिकाणी लसीकरण सुरु, लस घेण्यासाठी नागरिकांनी आधी खात्री करुन जावं : महापौर
मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्राबाहेरही लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या लसीकरणाविषयी माहिती दिली. तसेच मुंबईत एकूण 37 ठिकाणी आज लसीकरण सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच नागरिकांनी खात्री करुन लस घेण्यासाठी जावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मुंबई : सध्या देशासह राज्यातही कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरही ताण आला आहे. देशातील अनेक राज्यांत ऑक्सिजन, बेड्स, लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्राबाहेरही लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या लसीकरणाविषयी माहिती दिली. तसेच मुंबईत एकूण 37 ठिकाणी आज लसीकरण सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.
महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, "आपण प्रत्येक वेळी सगळ्यांना दाखवतोय की, आपल्याकडे इतकाच साठा आहे. लोकांनी लस घेण्यासाठी जाताना आधी खात्री करुन जायला हवं. लसींचा साठा सकाळी 10 वाजता येतो आणि त्यानंतर रुग्णालय, केंद्रांवर जातो. लोक जर त्याबाबत विचारपूस करून गेले, तर त्यांची धावपळ कमी होईल. 1 मे पासून आपण 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करणार आहोत. यासाठी सर्वच स्तरावर नियोजन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लसीकरणाचा साठा जसा पोहोचेल, त्यानुसार टप्प्यांनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा पद्धतीने लसी दिल्या जातील. उपलब्ध लसींचा साठा देखील बोर्डवर दाखवला जाईल. त्यानुसार लोकांनाही कळू शकेल. अनेक ठिकाणी असं घडतंय की, 300-350 लोकांचं लसीकरण झालं की, साठा संपतो आणि मग उरलेल्या लोकांचे वाद होतात."
पाहा व्हिडीओ : Mayor Kishori Pednekar | मुंबईत 37 केंद्रावर लसीकरण सुरु आहे : महापौर किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात बोलताना लसीकरण सुरु असणाऱ्या केंद्रांची यादी जाहीर केली. या यादीत मुंबईतील मुंबईत मित्तल रुग्णालय, क्रिटिकेअर रुग्णालय, तुंगा रुग्णालय, लाईफलाईन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, शिवम रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय एनलॉक्स रुग्णालय या खासगी रुग्णालयांमध्ये आजही लसीकरण सुरू आहे. पालिकेच्या माध्यमातून जेजे रुग्णालय, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, केईएम रुग्णालय, टाटा रुग्णालय, एसएआयएस रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, भाभा रुग्णालय, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर, कूपर रुग्णालय, टोपीवाला रुग्णालय, गोकुळधाम प्रसुतीगृह, मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्र, सखापाटील रुग्णालय, मालवणी सरकारी रुग्णालय, चोक्सी प्रसूतीगृह, आप्पापाडा प्रसूती रुग्णालय, आंबेडकर रुग्णालय, आकुर्ली प्रसूतीगृह, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, शताब्दी रुग्णालय, मां रुग्णालय यांसारख्या सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये मोफत लस दिली जात असल्याचं सांगितलं.
घरोघरी जाऊन नाही, तर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरणाचा विचार : महापौर
लसीकरण मोहिमेबाबत बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "1 मेपर्यंत जर मुबलक लसींचा साठा आला, तर वस्तीत जाऊन कोविन अॅपवर नोंदणी करून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लसीकरण करता येऊ शकेल. त्यासंदर्भात आम्ही विचार करतो आहोत. सध्या तरी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा आमचा विचार नाही. वस्ती पातळीवर जाऊन नोंदणी करूनच त्यांना लस देण्याचा विचार पालिका करत आहे. केंद्र सरकारच्या अॅपच्या माध्यमातूनच लस दिली जाईल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
