Mumbai Mayor on Lockdown: कोरोनाची ही लाट म्हणजे त्सुनामी, नागरिकांचा जीव वाचवण्यालाच आमचं प्राधान्य- किशोरी पेडणेकर
परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी नव्यानं कोविड सेंटरच्या उभारणीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे.
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट मुंबईसह राज्यावरही धडकली आणि पाहता पाहता नियंत्रणात असणारा हा संसर्ग हाताबाहेर गेला. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी नव्यानं कोविड सेंटरच्या उभारणीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. ही सर्व परिस्थिती, रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. ज्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही लाट म्हणजे त्सुनामी असल्याचं म्हणत नागरिकांना सतर्क केलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, याबाबतची माहिती देत असताना सध्याच्या घडीला नागरिकांचा जीव वाचवणंच प्रशासनासाठी प्राधान्यक्रमावर आहे, असं त्या म्हणाल्या. शिवाय सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या लॉकडाऊनच्या चर्चांनाही त्यांनी स्पष्ट नकार दिला नाही. त्यामुळं येत्या काळात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वबाजूंनी विचार करत निर्बंध कठोर केले जाऊ शकतात ही बाब समोर आली.
'कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून कोणीही वाचू शकत नाही हे सर्वजण जाणतो. याच परिस्थितीमध्ये राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षभरात आव्हानाच्या परिस्थितीमध्ये समर्थपणे जबाबदारी पार पाडली. सर्वांनी याकडे वेगळ्या नजरेतून पाहावं, नागरिकांनी जबाबदारीनं वागावं. सर्वजण आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. पण, जीव यातही वाचणं सर्वात महत्त्वाचं आहे. सर्वांनीच व्यवस्थितरित्या ही जबाबदारी सांभाळली, कोरोनासाठी आखून दिलेले प्रतिबंधात्मक नियम पाळले तर, कोरोनाचं हे जीवघेणं संकट आपण टाळू शकतो', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत नवे कोविड सेंटर
सद्यस्थिती पाहता मुंबईत नव्यानं कोविड सेंटर आणि रुग्णांसाठी बेडची व्यवस्था केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या रेल्वेचे 2800 बेड तयार असून, त्याच्यावर महानगरपालिकेचे अधिकारी विचार करत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. वरळीमध्ये शनिवारी एनआयसीएमध्ये बेडची संख्या वाढवण्यात आली. तिथं 200 ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात आल्याचं म्हणत त्यांनी अत्यावश्यक माहिती दिली. येत्या काळात एकट्या वरळीमध्ये जवळपास अडीच हजार बेड तयार असतील. तर, कांजूरमार्ग, मालाड या भागातही त्याच धर्तीवर कामं सुरु आहेत असंही किशोरी पेडणाकर म्हणाल्या. येत्या काळात मुंबईत मालाड, कांजूरमार्ग, वरळी या भागांमध्ये कोविड सेंटरमध्ये एकूण 5800 बेड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. यापैकी काही बेड हे आयसीयु, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अशा सुविधांसाठी विभागलेले असतील.
आवडीच्या रुग्णालयाचा हट्ट नको
नागरिकांनी सध्याच्या परिस्थिती जिथं बेड उपलब्ध असेल तिथं उपचार घेण्यास तातडीनं सुरुवात करावी आणि कोरोनाचं हे संकट अधिक बळावून देऊ नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली. शक्य त्या सर्व परिनं नागरिकांच्या मदतीसाठी महानगरपालिका तत्पर असल्याचा विश्वास त्यांनी दिला. 'तुमचा जो वॉर्ड असेल तिथे नोंदणी करा, उपलब्धतेनुसार त्वरित तुम्हाला बेड दिला जाईल. अशा वेळी पर्याय निवडण्यात वेळ दवडू नका. ही आरोग्याच्या दृष्टीनं आलेली त्सुनामी आहे. कारण, मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढली होती यंदा मात्र एप्रिलमध्येच ही परिस्थिती आहे. त्यामुळं बचेंगे तो और लढेंगे..., असं म्हणत राजकारण बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून कोरोनाचा लढा जिंकू', अशा शब्दांत त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी नागरिक, विरोध आणि माध्यमांना त्यांनी विनंती केली.