(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mantralaya : अचानक मंत्रालयावर सुरू झाला दगडांचा वर्षाव, गाड्यांच्या काचा फुटल्या; सबवेच्या कामासाठी ब्लास्ट केल्यानंतर कंपनीवर गुन्हा दाखल
Mumbai Mantralaya : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाच्या दिशेने आलेल्या दगडांमुळे काही नुकसान झाल्याचं समोर आलं.
मुंबई: मंत्रालयाच्या आवारात आज अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला, त्यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाच्या काचाही फुटल्या. अचानक झालेल्या या दगडांच्या वर्षावामुळे कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली. सुरक्षारक्षकांनी हे कुठून होतंय हे पाहिल्यानंतर मात्र वेगळंच कारण समोर आलं. मंत्रालयाच्या जवळ सुरू असलेल्या सबवेच्या कामाच्या ठिकाणी ब्लास्ट करण्यात आल्यामुळे मंत्रालयाच्या दिशेने हे दगड आले होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर मात्र एल अँड टी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गाड्यांच्या काचा फुटल्या
अचानक आलेल्या या दगडांमुळे मंत्रालयातील गाड्यांच्या आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. मंत्रालय ते विधानभवन सबवेचं काम सुरू असताना केलेल्या ब्लास्टमध्ये या काचा फुटल्या. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचं काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
मंत्रालयाजवळ एका सबवेचं काम सुरू आहे. मंत्रालय ते विधानभवन जोडणारा हा सबवे आहे. या सबवेमध्ये अंतर्गत ब्लास्टिंग केल्यांनंतर त्याचे दगड थेट मंत्रालयात आले. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण हे मंत्रालयातील मेन गेटजवळची आहे. या गेटमधून मंत्रालयातील सर्व मंत्री आणि अधिकारी येत असतात, या ठिकाणाहून व्हीआयपी गाड्या येत असतात. मात्र हे दगड येत असताना मंत्रालयाच्या परिसरात कोणी नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
निष्काळजीपणाचा कळस
ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे त्या कंपनीकडून आज निष्काळजीपणाचा कळस झाल्याचं दिसून आलं. या आधीही अनेकदा अशा प्रकारचे ब्लास्ट करण्यात आले आहेत. त्याचे अनेकदा धक्के मंत्रालयातील कार्यालयांना जाणवले आहेत. आज करण्यात आलेल्या ब्लास्टची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. आज करण्यात आलेल्या ब्लास्टची तीव्रताही मोठी होती. मंत्रालयातील घडलेली ही घटना मोठी मानली जात आहे.
प्रशासकीय इमारतीत चाकू घेवून जाताना एक जण ताब्यात
मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर देखील आज अशीच काही घटना घडली आहे. प्रशासकीय इमारतीत चाकू घेवून जाताना एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. बॅग स्कॅनरमध्ये बॅग स्कॅन करताना धारदार चाकू सापडला आहे. पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेतल्याने व्यक्तीच्या बॅगेतील चाकू ताब्यात घेण्यात आला आहे. उमरगा येथून आलेल्या एका तरुणाच्या बॅगेत हा चाकू सापडला. बॅगेत चाकू घेऊन येण्यामागचं कारण काय? याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.