(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीपीसीएल प्लान्टमधील स्फोटाचा फेक व्हिडीओ वायरल
बीपीसीएलमधील अग्नितांडवाचा फायदा घेऊन काही अतिउत्साही लोकांनी सोशल मीडियावर एका स्फोटाचा खोटा व्हीडिओ वायरल केला आहे.
बीपीसीएल प्लान्टमध्ये स्फोट मुंबई : चेंबूर-वडाळ्याजवळ भारत पेट्रोलियम रिफायनरीमधील (बीपीसीएल) हायड्रोक्रॅकर प्लान्टमध्ये स्फोटमुळे काल माहुलगाव परिसर हादरला. बीपीसीएलमधील अग्नितांडवाचा फायदा घेऊन काही अतिउत्साही लोकांनी सोशल मीडियावर एका स्फोटाचा खोटा व्हीडिओ वायरल केला आहे.
मात्र 'एबीपी माझा'ने या व्हिडीओची पडताळणी केल्यानंतर हा व्हिडीओ मुंबईतील नसल्याचे स्पष्ट झाले. हा वायरल व्हिडीओ मेक्सिकोतील एका रिफायनरीमधील असल्याचं समोर आलं आहे. बीपीसीएलमधील आगीच्या घटनेनंतर मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण असताना असे व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेक अफवा पसरत होत्या. त्यामुळे असे खोटे व्हिडीओ सोशल मीडियावरून फॉरवर्ड करताना एकदा शहानिशा करणे आवश्यक आहे.
आग आटोक्यात बीपीसीएल पेट्रोलियम प्लान्टमध्ये लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. काल दुपारी बीपीसीएलमधील हायड्रोक्रॅकर प्रोसेसरला भीषण आग लागल्यानंतर रात्रभर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करत ही आग आटोक्यात आणली आहे. या दुर्घटनेत बीपीसीएल कंपनीतील 41 कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.
आजूबाजूच्या परिसरातील घरांचं नुकसान बीपीसीएल कंपनीत लागलेल्या आगीमुळे कंपनीला लागून असलेल्या गव्हाणपाडा परिसरातील घरांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक घरांचे पत्रे उडाले असून घरांच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. स्फोटातून बाहेर पडलेल्या गॅसमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कालच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
बीपीसीएल रिफायनरीच्या बॉयलरमध्ये काल दुपारी 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटानंतर आग आणि धुराचे लोट पसरले होते. पेट्रोकेमिकल प्लान्ट असल्यामुळे हा परिसर अतिशय संवेदनशील आहे. आजूबाजूला दाटीवाटीची वस्ती असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
संबंधित बातम्या