(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Rains LIVE : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी
Mumbai Rains LIVE : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
LIVE
Background
Mumbai Rains LIVE : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग सुरु आहे. लालबाग, परळ, वरळी, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या सर्व परिसरामध्ये वरुणराजा बरसत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये सर्व ठिकाणी पाणी साचलं होतं, मात्र मध्यरात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे सखल भागांमधून पाणी निघून गेलं.
कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र सकाळी काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
मुंबईत सलग 12 तास पाऊस, आसपासच्या परिसरात साचले पाणी
गुरूवारी मुंबईत सलग 12 तास पाऊस झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले आहे. पहिल्यास मुसळधार पावसात मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत सकाळी 8 ते रात्री 8.30 पर्यंत बारा तासात कुलाबा 176 मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रुज 137 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पालिकेचा नालेसफाई दावा फोल
काल झालेल्या पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात बुधवारी रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहे. तर अधून मधून जोरदार पाऊस आहे. काल दुपारनंतर वसई विरार मध्ये पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे. वसई, नालासोपारा आणि विरार मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. यामुळे पालिकेचा नालेसफाई दावा फोल ठरल्याच दिसून येत आहे.
पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड
गेल्या 12 तासांत मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे आणि त्यामुळे मुंबई जाम झाली आहे. अंधेरी, दादर, परळ भागात पाणी साचलं आहे. दादर आणि परळमध्ये गुरूवारी पाच किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्यात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मध्य रेल्वे मार्गावर दादर स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकलच्याही रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी लोकलमध्ये अडकले होते. मुंबईत रस्ते जाम आणि लोकल ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, काल झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई तुंबली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली
नवी मुंबई , पनवेलमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग
दोन दिवसांपासून नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. पनवेल, कामोठे, वाशीसह इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कुठेही पाणी साचल्याची घटना घडलेली नाही
कणकवलीमधील सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा पडत असलेल्या दमदार पावसामुळं प्रवाहित झाला आहे. सावडाव धबधबा 30 फूट उंच काळ्या कातळावरुन फेसाळत कोसळत आहे. हे कातळ 60 ते 70 फूट रुंदीचे आहे. गर्द वनराईतुन वाहत फेसाळत कोसळणारा हा धबधबा पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षित धबधबा आहे. मुंबई गोवा महामार्गावरून सावडाव धबधबा जवळ असल्याने पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे.
कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप
Kalyan Rain : कल्याण डोंबिवलीत रात्रभर पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळपासून पुन्हा कल्याण डोंबिवलित पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. कालपासून सुरु झालेल्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
संपूर्ण कोकणात पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरुआहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, कोकणात देखील पाऊस सुरु आहे. संपूर्ण कोकणासाठी पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.