Mumbai Local : मोठी बातमी! पावसामुळे खोळंबलेली मुंबई लोकल पूर्ववत, सर्व मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत
Mumbai Local Train News : पावसामुळे खोळंबलेली मुंबई लोकल सेवा पूर्ववत झाली आहे. सर्व मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Mumbai Local Train Update : मुंबईत जोरदार पावसामुळे खोळंबलेली मुंबई लोकल सेवा पूर्ववत झाली आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या 'लाईफलाइन'ला बसला होता. पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे. याचा फटका मुंबई लोकलला बसला. कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. हार्बर लाइन वडाळा ते मानखुर्द लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. आता मध्ये रेल्वेने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, सर्व मार्गावरील वाहतूक सेवा सुरळीत झाली आहे.
मुंबई लोकल सेवा पूर्ववत
दरम्यान, आता सर्व रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मध्ये रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वेने ट्वीट करत सांगितलं आहे की, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 5 वाजेपासून सुरळीत सुरु झाल्या आहेत. डाऊन हार्बर सीएसटी ते वडाळा लोकल सुरू आहे. तसेच, डाऊन हार्बर मानखुर्द ते पनवेल लोकल सेवा सुरू आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेवरही परिणाम झाला असून मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवाही सुरू आहे.
कुर्ला हार्बर सुरळीत सुरु आहे, मात्र 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत. कुर्ला पुढे पाणी भरल्याने वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत वडाळा ते मानखुर्द लोकल वाहतूक बंद होती. आता कुर्ला रेल्वे स्थानकावरचं गर्दीचं चित्र देखील ओसरलं आहे.
Central railway- Mumbai division
— Central Railway (@Central_Railway) July 21, 2023
Monsoon updates-
17.00 hrs, 21/07/23-
All section trains are running. pic.twitter.com/SiCsmpn2WA
मुसळधार पावसाचा मुंबई लोकलला फटका
हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकात पाणी साचलं होतं. त्यामुळे डाउन हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द विभाग उपनगरीय वाहतूक सुरक्षा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती. वडाळा ते मानखुर्द रेल्वेसेवा 2.45 वाजेपासून बंद करण्यात आली होता. इतर लोकल सेवा सुरळीत चालू होती. डाऊन वडाळा ते मानखुर्द वगळता हार्बर लाईनवरील अप आणि मेनलाइनवरील गाड्या सुरु होत्या. सीएसएमटी ते वडाळा/गोरेगाव पर्यंत डाऊन हार्बर लोकल सुरु आहे तर, मानखुर्द ते पनवेल अशी डाऊन वाहतूक सुरु होती.
मुंबईत 3 ते 4 तासात पावसाचा जोर वाढणार
पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मुंबईत पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तास मुंबईकरांसाठी धोक्याचे असल्याचं समोर येत आहे. पुढील काही तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.