(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local : हार्बर मार्गावर पुढील 22 दिवस ब्लॉक, शेवटची लोकल लवकर सुटणार, तर पहिली लोकल...
Mumbai Local : आजपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत हार्बर मार्गावर 22 दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत.
मुंबई : सोमवार (11 सप्टेंबर) पासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत रात्रकालीन मेगाब्लॉक (Megablock) घोषित केला आहे. हा मेगाब्लॉक 22 दिवसांचा असणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या कामासाठी या मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. तर पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर (Harbour Line) आणि ट्रान्सहार्बर (TransHarbour) वरील लोकल सेवेवर प्रमाण होणार आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर अर्थातच जेएनपीटी ते ग्रेटर नोएडातील दादरीपर्यंत मार्गिका तयार करण्यात येणार आहे. पनवेल स्थानकावर याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून दोन मार्गिका उभारण्यात येतील. त्यामुळे लोकल पार्किंगच्या मार्गिकांमध्ये बदल होईल. त्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
असं असेल लोकलचं वेळापत्रक
यामुळे लोकलच्या वेळापत्रकात देखील बदल होणार आहे. पहाटे सीएसएमटी स्थानकावरुन पहिली लोकल ही 4.28 वाजता सुटत होती. पण आता हीच लोकल पहाटे 4.32 ला सुटेल. तर ठाण्याहून पनवेलसाठी पहिली लोकल ही पहाटे 5.12 सुटत होती. पण आता हीच लोकल पहाटे 6.20 मिनिटांनी सुटेल. तसेच पनवेलवरुन सीएसएमटीच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ही पहाटे 4.03 मिनिटांनी सुटत होती. पण आता हीच लोकल 5.40 मिनिटांनी सुटेल.
तर पनवेलवरुन ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल ही पहाटे 4.33 वाजता सुटायची. ही लोकल आता सकाळी 6.13 मिनिटांनी सुटेल. तर सीएसएमटी स्थानकावरुन रात्री 12.40 ची पनेवलसाठी सुटणारी शेवटची लोकल होती. पण यामुळे रात्री 10.58 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकावरुन पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल सुटेल. ठाण्यावरुन पनवेलला जाणारी रात्री 12.05 ची शेवटची लोकल होती. पण आता ठाण्यावरुन शेवटची लोकल ही 11.32 ला सुटेल.
काही लोकल रद्द
या कामामुळे काही लोकल सेवा या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी स्थानकावरुन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये रात्री 11.14 आणि 12.14 ची लोकल रद्द झाली आहे. तर पहाटे 5.18 आणि 6.40 मिनिटांची लोकल ही रद्द करण्यात आलीये. पनवेलवरुन सीएसएमटीच्या दिशेने जाणारी रात्री 9.52 आणि 10.58 ची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर पहाटे 4.03 आणि 5.31 ची लोकल रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते पनवेल मर्गावरील रात्री 9.36, 12.05 आणि पहाटे 5.12, 5.40 ची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर पनवेल ते ठाणे मर्गावरील रात्री 11.18 ची लोकल रद्द करण्यात आली असून पहाटे 4.33 आणि 4.53 ची देखील लोकल रद्द झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना लोकलचं वेळापत्रक पाहूनच प्रवास कारावा असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
ST Strike Updates : सरकार आणि एसटी कामगार संघटनेतील चर्चा सकारात्मक; बेमुदत उपोषण मागे