Mumbai Local : अपुरे डबे अन् दरवाज्याला लटकत्या लाडक्या बहिणी; बुलेट ट्रेनची स्वप्ने दाखवणारे महिला प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष कधी देणार?
Problems Of Women Passengers Mumbai Local : पश्चिम रेल्वेवर 10 तर मध्य रेल्वे वर फक्त दोनच लेडीज स्पेशल ट्रेन चालवल्या जातात. त्यामुळे महिला प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

मुंबई : एकीकडे आपण बुलेट ट्रेनच्या गप्पा मारतोय, पण दुसरीकडे आपल्याच लाडक्या बहिणी कामासाठी जा-ये करताना आपला जीव मुठीत घालून प्रवास करतात. कामावर उशीर झाला म्हणून किंवा आतमध्ये जागा नाही म्हणून लटकून प्रवास करावा लागतो. पीक अवरमध्ये लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्याकडे पाहिलं तर बहुतांश महिला या दरवाजाला लटकून प्रवास करताना दिसतात. या महिलांमध्ये मग कधी कधी भांडणे होतात आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओवर आपण मजेशीर कमेंट्सही पास करतो. पण मुंबईच्या लोकलमध्ये या गोष्टी का होतात? महिला प्रवाशांच्या समस्या नेमक्या काय आहेत? याकडे मात्र सोईस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं.
लोकलच्या 12 किंवा 15 डब्यांमध्ये फक्त दोन डबे हे महिलांसाठी आरक्षित असतात. या डब्यातून आत शिरणे आणि प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून, श्वास रोखून प्रवास करणे. असं असलं तरी या महिला निमुटपणे प्रवास करतात. कारण त्यांना सकाळची घरातील सर्व कामे आवरुन वेळेवर कामावर पोहोचायचं असते. तर दिवसभर काम करून परत संध्याकाळी घरी लवकर जाऊन कुटुंबाच्या जेवणाचं पाहायचं असतं. असा प्रवास करताना महिलांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे असतात.
लोकलमधून प्रवास करताना महिलांसमोर काय समस्या?
Women Passengers Mumbai Local : महिलांना अपुरे पडणारे डबे
गेल्या काही वर्षांत कामावर जाणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. पण लोकलमध्ये आरक्षित डबे तेवढेच आहेत. सध्या 12 डब्यांच्या लोकलमध्ये महिलांचे केवळ दोनच डबे आरक्षित आहेत. त्यात फर्स्ट क्लासमध्ये छोटे कंपार्टमेंट आरक्षित आहेत.
मासिक पाळीच्या काळातही बसायला जागा नाही
ट्रेन लेट असते, त्यामुळे कामावर जाण्यास उशीर होतो. त्यामुळे महिलांची चिडचिड होते. ती चिडचिड कधी कधी छोट्या-मोठ्या कारणावरून बाहेर येते आणि भांडणे होतात. तसेच मासिक पाळीच्या दिवसात महिलांना आधीच शारिरीक त्रास होत असतो. त्यात बसायला सोडाच पण उभे राहायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे आधीच वैतागलेल्या महिला अधिकच वैतागतात.
Ladies Special Local Train : लेडीज स्पेशल ट्रेनची अपुरी संख्या
लेडीज स्पेशल लोकलची संख्या वाढवली गेली नाही. पश्चिम रेल्वेवर 10 तर मध्य रेल्वे वर फक्त दोनच लेडीज स्पेशल ट्रेन चालवल्या जातात. तसेच हार्बर रेल्वेवर देखील केवळ दोनच लेडीज स्पेशल चालवल्या जातात. ही संख्या अपुरी असून त्याच्या संखेत वाढ करावी अशी मागणी केली जात आहे.
Mumbai Local Train : डब्याच्या तोंडाजवळची गर्दी
अनेक महिलांना उशिरा उतरायचे असूनही त्या आधीच डब्याजवळ उभ्या राहतात. त्यामुळे ज्या महिलांना लवकर उतरायचे असते किंवा प्लॅटफॉर्म वरून चढायचे असते त्यांना जागा मिळत नाही. शेवटी बसण्याच्या आणि उभ्या राहण्याच्या जागेवरुन भांडणे होतात.
एकमेकांना धक्का लागल्याने वाद
हातात असलेल्या सॅक आणि बॅग यामुळे एकमेकींना धक्का लागतो. कधी कधी पिशव्या आणि खाण्याच्या डब्याची बॅगही चढताना-उतरताना अडकतात. यामुळे भांडणे होतात. तसेच समोरच्या महिलेचे केस, ओढणी, ड्रेस, पिना दुसऱ्या महिलेांना लागतात. त्यावरुन अनेकदा वाद झाल्याचं दिसून आलं आहे.
एकीकडे महिला या लाडक्या बहिणी असल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय, मात्र त्याचवेळी या लाडक्या बहिणींचा जीव मुठीत घालून होणाऱ्या प्रवासाकडे मात्र दुर्लक्ष केलं जातंय हे वास्तव आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या या समस्यांकडे सरकारने गांभिर्याने लक्ष दिलं पाहिजे.
ही बातमी वाचा:






















