Mumbai Local Train : ट्रेन आली फाटक मात्र उघडेच तर गेटमन झोपलेला...दिवा वसई मार्गावरील धक्कादायक प्रकार
Mumbai Local Train : दिवा-वसई रेल्वे मार्गावर डोंबिवली पूर्वेकडून डोंबिवली पश्चिमेकडे मोठागाव इथे जाण्यासाठी रेल्वे फाटक आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हे फाटक उघडेच होते.
Mumbai Local Train : मुंबईची (Mumbai) लोकल ट्रेन प्रवाशांची लाईफलाईन आहे. परंतु या लोकल ट्रेनमधून (Mumbai Local) प्रवास करताना अपघात होण्याच्या घटनांची संख्याही मोठी आहेत. बऱ्याचदा निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. परंतु दिवा-वसई रेल्वेमार्गावर (Vasai Diva) कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्या ठिकाणी प्रवासी असते तर चित्र कदाचित वेगळं असतं.
रेल्वे फाटक बंद करण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा
दिवा-वसई रेल्वे मार्गावर डोंबिवली पूर्वेकडून डोंबिवली पश्चिमेकडे मोठागाव इथे जाण्यासाठी रेल्वे फाटक (Railway Gate) आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हे फाटक उघडेच होते. एका जागरुक नागरिकाने या ठिकाणी ट्रेन येताना पाहिली तेव्हा त्याने फाटकाशेजारी असलेल्या केबिनमध्ये धाव घेतली. यावेळी फाटक उघडण्यासाठी असलेला कर्मचारी झोपलेला असल्याचे दिसून आले. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या ठिकाणी कोणताही अपघात झाला नाही.
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
या नागरिकाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी या व्हिडीओची दखल घेतली. संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी त्यांनी ट्वीट माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
@Central_Railway @RailMinIndia dangerous situation at Diva-Vasai Gate NO1 railway crossing at Mothagaon night 2am railway authority should take strict action. pic.twitter.com/CkYVQiT8ce
— Dipesh Pundlik Mhatre (@Dipesh99Mhatre) January 4, 2023
मुंबई मेट्रो ट्रेनच्या दरवाज्यात तरुणीचा ड्रेस अडकला आणि ती प्लॅटफॉर्मवर फरफटत गेली
दरम्यान दोन ते अडीच महिन्यांपूर्वी मुंबईच्या मेट्रो वनच्या चकाला स्थानकावर अपघात झाला होता. मेट्रो ट्रेनमध्ये चढताना एका तरुणीचा ड्रेस ट्रेनच्या दरवाज्यात अडकला. त्यानंतर मेट्रो ट्रेन सुरु झाल्यावर तरुणी प्लॅटफॉर्मवर फरफटत गेली. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 21 ऑक्टोबरला ही घटना घडली होती. अपघातानंतर तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र ट्रेनचे नियम मोडल्यावर काय परिणाम होतात, याचाच प्रत्यय या व्हिडीओतून येतो.