Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
Mumbai Railway News: मुंबईतील लोकल ट्रेन कायम उशीरा धावतात, अशी ओरड नेहमी सुरु असते. तांत्रिक बिघाड आणि अन्य कारणांमुळे प्रवाशांचा होणार खोळंबा ही परवलीची बाब झाली आहे. पण 'रोज मरे त्याला कोण रडे'?, अशी परिस्थिती आहे.
मुंबई: मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा कायम चर्चेचा विषय असतो. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर ते अगदी थेट कर्जतमधील अनेक चाकरमनी अवलंबून असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) होणारा विलंब आणि त्यामुळे होणारी गर्दी हा सातत्याने चर्चेचा विषय आहे. याशिवाय, दर काही दिवसांनी होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे अधुमधून मध्य रेल्वेमार्गावरील (Central Railway) लोकल ट्रेन्सचे वेळापत्रक कोलमडत असते. यावरुन प्रवाशी संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीच करु शकत नाही. यावर उपाय म्हणून रेल्वेच्या किमान एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवावे. जेणेकरुन लोकलचा गोंधळ आटोक्यात येईल, असा प्रस्ताव प्रवाशी संघटनांकडून मांडण्यात आला होता. मात्र, रेल्वेचे बडे अधिकारी मुंबई सोडून कल्याणमध्ये जाण्यास तयार नसल्याचे समजते.
अनेक चाकरमनी दररोज बदलापूर, कल्याणवरुन धक्के खात मुंबईतील आपापली कार्यालयं गाठत असतात. मात्र, दक्षिण मुंबईत वास्तव्य करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांची कल्याणपर्यंत दररोज प्रवास करण्याची इच्छाशक्ती नाही. मुंबईतील मुख्यालयात बसून या रेल्वे अधिकाऱ्यांना लोकल ट्रेन्सच्या विलंबामुळे उडणारा गोंधळ आणि प्रवाशांच्या हालाची कल्पना येत नाही. त्यामुळे रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती बघणे गरजेचे आहे. प्रवासी संघटना अथवा सामान्य प्रवासी यांना तक्रार करायची असेल, तर थेट मुंबईत जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे जावे लागते. कल्याणला वरिष्ठ अधिकारी बसले, तर येथेच तक्रार करणे व त्यावर उपाय करणे सोपे होईल, असे प्रवाशी संघटनांचे म्हणणे आहे.
मुंबईत लोकल ट्रेनने दररोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वे खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे बहुतांश निर्णय हे दिल्लीतून वरिष्ठ पातळीवर होतात. मात्र, मुंबईतील लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांना यामध्ये कोणताही हस्तक्षेप किंवा सूचना करता येत नाही. त्यामुळे मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा सुधारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवाशी संघटना आणि स्थानिक यंत्रणांचे म्हणणे विचारात घेतले गेले पाहिजे, अशी मागणी सातत्याने होत आहे.
खासदारांच्या मागणीला केंद्र सरकारकडून केराची टोपली
रेल्वेचे अनेक बडे अधिकारी हे मुख्यत: उत्तर भारत किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून आले आहेत. या अधिकाऱ्यांना राहण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी दक्षिण मुंबईत राहणे सोयीचे पडते. त्यामुळे कोणताही बडा अधिकारी कल्याणमध्ये बसायला तयार नसल्याचे समजते. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण स्थानक हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पण, येथे रेल्वेचा एकही उच्चपदस्थ अधिकारी बसत नाही. एडीआरएम, एजीएम दर्जाचा अधिकारी कल्याण येथे बसू लागला, तर दररोजच्या लोकल गोंधळावर नियंत्रण येईल, असे प्रवाशांना वाटते. रेल्वेच्या एका तरी वरिष्ठ अधिकाऱ्याने कल्याण जंक्शन येथे बसावे, यासाठी खासदार आनंद परांजपे, त्यानंतर खा. संजीव नाईक, सुरेश टावरे, बळीराम जाधव यांनी प्रयत्न केले होते. मात्र, केंद्र सरकारकडून दरवेळी या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
आणखी वाचा