प्लॅटफॉर्मवरील मस्ती जीवावर बेतली, मित्राने धक्का दिल्याने तोल गेलेल्या तरुणाचा लोकलची धडक लागून मृत्यू
Kandivali Local Train Accident : मित्राने धक्का दिल्याने रेल्वे स्थानकाच्या कठड्यावरुन तोल जाऊन मागून येणाऱ्या लोकलची धडक लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली स्थानकावर हा थरारक अपघात घडला.
Kandivali Local Train Accident : मुंबई लोकल (Mumbai Local) सेवेच्या कांदिवली रेल्वे स्थानकावर (Kandivali Railway Station) दोन मित्रांमधली मस्ती एकाच्या जीवावर बेतली आहे. मित्राने धक्का दिल्याने रेल्वे स्थानकाच्या कठड्यावरुन तोल जाऊन मागून येणाऱ्या लोकलची धडक लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. हा थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी बोरीवली रेल्वे स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
कांदिवली रेल्वे स्थानकावर 21 जुलै रोजी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमासार प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर घडली, अशी माहिती जीआरपीने दिली. नेहमीप्रमाणे वर्दळ असल्याचं या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. या दरम्यान दोन मुलं प्लॅटफॉर्मवर मस्ती करताना येत असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी एका तरुणाला त्याच्या मित्राने मजामस्तीमध्ये धक्का दिला. परंतु बेसावध असलेल्या या तरुणाचा प्लॅटफॉर्मच्या कठड्यावरुन तोल गेला. महत्त्वाचं म्हणजे त्याचवेळी चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन वेगाने स्थानकात येत होती. मुलाचा तोल गेला आणि ट्रेनची त्याला जोरदार धडक बसली. यावेळी स्थानकावरील प्रवाशांना मोठ धक्का बसला. ही घटना अवघ्या क्षणार्धात घडल्याने तरुणाबाबत नेमकं काय झालं, हे समजण्यासाठी काही वेळ जावा लागला.
या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शिवाय त्याच्या एका हाताला आणि पायालाही मोठी दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडीओ शुक्रवारी (22 जुलै) व्हायरल झाला.
मुंबईच्या उपनगरीय सेवेच्या अर्थात लोकल ट्रेनच्या माध्यमातून लाखो मुंबईकर प्रवास करतात. त्यामुळे लोकल ट्रेन ही लाखो मुंबईकरांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनली आहे. परिणामी लोकलमधील गर्दी नित्याची बाब बनली आहे. त्यामुळे लोकल ट्रेनमधून पडून अपघात होण्याचं प्रमाणही जास्त आहे. गर्दीमुळे ट्रेनमधून पडून, ट्रेन पकडताना गाडीखाली येऊन किंवा स्टंट करताना अनेकांचे जीव जातात. रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म, ट्रॅकजवळ मस्ती करु नका असा सल्ला वारंवार दिला जातो. मात्र तरी देखील काही जण ऐकत नाहीत. या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यास काय घडू शकतं? हे दाखवणारा कांदिवलीमधील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
खरंतर रेल्वे स्थानकावर गाडीखाली येणाऱ्या अनेक प्रवाशांना वाचवल्याच्या घटना पाहिल्या आहेत. परंतु कांदिवली स्थानकावरील घटना एवढ्या पटकन घडली की मुलाला वाचवण्यासाठी मोटरमन किंवा इतर कोणाला कोणतीही संधी मिळाली नाही. आता या घटनेप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
Kandivali CCTV : मित्रांनी धक्का दिला, तरुणाचा तोल गेला, मागून येणाऱ्या लोकलची धडक