Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक, वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा
Mumbai Local Mega Block : रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाणार असल्याने रविवारी मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी/नेरूळ या दरम्यान रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते बोरिवली दरम्यान शनिवारच्या मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक राहणार नाही. ब्लॉकदरम्यान रेल्वे रुळांची तसेच सिग्नल यंत्रणांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाणार आहे. या कारणामुळे काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या विलंबाने धावतील.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात धिम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत, त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील तर काही लोकल गाड्या सुमारे 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
ट्रान्स-हार्बर मार्ग
तर ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार असून, या कालावधीत संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान कोणताही ब्लॉक नसल्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे
तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 11:30 ते पहाटे 4:45 या वेळेत भाईंदर ते बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर स्वतंत्र ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात बोरिवली ते विरार/वसई रोडदरम्यान धावणाऱ्या जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही फेऱ्या विलंबाने धावतील.
दोन दलालांना अटक
दरम्यान, सर्वसामान्यांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचण येत असताना, दलालांकडून मात्र तीच तिकिटे अवैधरीत्या चढ्या दराने विकली जात असल्याचे उघड झाले आहे. मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने मलकापूर (जि. बुलडाणा) येथील प्रवासी आरक्षण केंद्रातून दोन दलालांना अटक केली असून, त्यांच्या कब्जातून 10 लाखांहून अधिक किंमतीची 182 तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. ही तिकिटे बेकायदा पुनर्विक्रीसाठी आरक्षित करून मुंबईतील दलालांना पुरवली जात असल्याची कबुली या रॅकेटचा सूत्रधार संजय चांडक याने दिली आहे.
आणखी वाचा























