लालबाग उड्डाणपूल आजपासून तीन महिने वाहतुकीसाठी बंद; 'या' वेळेत चालणार दुरुस्तीचं काम
लालबाग उड्डाणपूल उड्डाणपूल 24 मार्चपासून 15 जूनपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजता या कालावधीत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या पीयर्सच्या बेअरिंग आणि सांधे बदलणे असे दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा पूल बंद ठेवण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मध्य मुंबईतील लालबाग आणि दक्षिण मुंबईतील भायखळा विभागाला जोडणारा महत्त्वाचा लालबाग उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून दररोज रात्री 11 ते सकाळी 6 यावेळेतवाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलाचे पिलर्सच्या बेयरिंग आणि सांधे बदलण्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून पुढील तीन महिने करण्यात येणार आहे. त्यामुळे 15 जूनपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुंबई दक्षिण विभागाचे वाहतूक पोलीस उपआयुक्त योगेश कुमार यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. या उड्डाणपुलावरून ये-जा करणारी वाहतूक पुढील तीन महिने रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत लालबाग उड्डाणपुलाखालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने ये जा करणार आहेत.
परळ उड्डाणपूल आणि परेल टीटी जंक्शनच्या दिशेने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी, तसेच भायखळा मार्केटकडून राणीच्या बागेसमोरुन उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक 24 मार्चपासून 15 जूनपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ : लालबाग उड्डानपूल दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून बंद
त्यानुसार, परळ पूल आणि परळ टी.टी. जंक्शनकडून येणारी आणि भायखळ्याकडे जाणारी वाहतूक लालबाग उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरुन भायखळ्याच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. तसेच भायखळा मार्केटकडून लालबाग उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीला देखील पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार ही वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने परळच्या दिशेने जाईल.
वाहन चालकांच्या मार्गदर्शनासाठी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर दिशादर्शक फलकही लावले आहेत. तसेच नागरिकांना मदत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतुक पोलीस प्रयत्न करणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :