Holi 2021 Celebration Guidelines: होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून निर्बंध लागू
कोरोना विषाणूच्या रुग्णांचे मागील काही दिवसांतील आकडे पाहता आता राज्यात आणि स्थानिक पातळीवरही प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णांचे मागील काही दिवसांतील आकडे पाहता आता राज्यात आणि स्थानिक पातळीवरही प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर मुंबईतही काही निर्बंध लावले जाण्यास सुरुवात झाली आहे.
काही दिवसांवर येऊ घातलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोरोनाबाबतची सावधगिरी पाळत होळी आणि धुलिवंदन सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई केली आहे. कोरोना रुग्णांची सध्याची संख्या आणि एकंदर धोका पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी येणारं धुलिवंदनाचं पर्व हे खासगी आणि सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर पालिकेनं निर्बंध आणले आहेत.
मी जबाबदार या मोहिमेअंतर्गत व्यक्तीगत पातळीवरही हा उत्सव साजरा न करण्याचं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे. सदर नियमावली आणि आवाहन पाहता नियमांचं उल्लंघन केल्यास साथरोग कायदा 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 आणि भारतीय दंडसंविधानाअंतर्गत असणाऱ्या 1860 कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
Coronavirus Guidelines | कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
दरवर्षी, मुंबई आणि उपनगरीय परिसरामध्ये होळी आणि धुळवडीच्या निमित्तानं अनेक सामुहिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. बऱ्याच सदनिकांमध्येही होळी दणक्यात साजरी होते. पण, कोरोनाचं संकट पाहता यंदाच्या वर्षी मात्र उत्साहाला आळा घालत हा सण आटोपता घ्यायचा आहे.
मंगळवारी केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, छत्तीसगढ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी मागील 24 तासांच आढळून आलेली तब्बल 81 टक्के रुग्णसंख्या याच 6 राज्यांतून आहे. सध्या देशात कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यासोबतच लसीकरणाच्या प्रक्रियेलाही वेग देण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. असं असलं तरीही देशात कोरोनाची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या सतर्कतेनं आणि पूर्ण सहकार्यानंच या विषाणूवर मात मिळवता येणं शक्य होणार आहे.