Independence Day 2022: भर पावसात अमित ठाकरे यांनी मध्यरात्री केले ध्वजारोहण
Independence Day 2022: मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुलुंड येथे भरपावसात मध्यरात्री ध्वजारोहण केले. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक उपस्थित होते.
Independence Day 2022: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Independence Day 2022) अनेक ठिकाणी मध्यरात्री ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुलुंड येथे आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'माझी पाच मिनिटे, माझ्या राष्ट्रगीतासाठी' या कार्यक्रमात मध्यरात्री मनसे नेते अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) , बाळा नांदगावकर, शिरीष सावंत यांनी भर पावसात ध्वजारोहण केले. मनसेचे विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण आणि एकनिष्ठ प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम १५ ऑगस्ट च्या मध्य रात्री आयोजित केला जातो.
यंदाच्या वर्षी या ठिकाणी राष्ट्रपती भवनची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली होती. यावेळी पहिल्यांदाच गोविंदा पथकाने थर लावून सलामी दिली. त्यानंतर 'बिगुल'च्या तालावर, एनसीसी कॅडेटची परेड, मशाल प्रज्वलन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम सुरू असताना पावसानेदेखील हजेरी लावली.
या वेळी व्यासपीठावर उपस्थित अमित ठाकरे आणि मनसेच्या इतर नेत्यांनी कार्यक्रम सुरूच ठेवला. या वेळी उपस्थित नागरीक देखील पावसात उभे राहत प्रतिसाद दिला. नियोजित ध्वजारोहण भर पावसात पार पडले. या वेळी मोठ्या जल्लोषात नागरिकांनी एकत्र राष्ट्रगीत म्हटले. यानंतर फटाक्यांची आतिषबाजीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यात मध्यरात्री ध्वजारोहण
मध्यरात्री बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्याच्या (Thane) शिवसेना (Shiv Sena) शाखेत ध्वजारोहण (Flag hoisting) केलं. आनंद दिघे (Anand Dighe) ठाणे जिल्हा प्रमुख असताना मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यानंतरही चाळीस वर्षापूर्वीची परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली असल्याचं हे दिसून आलं आहे. पण महत्वाचं म्हणजे, या कार्यक्रमात शिंदे गट विरुद्ध उद्धव गट आमनेसामने येणार होते. उद्धव ठाकरे गटात असलेले राजन विचारे यांना पोलिसांची नोटीस देऊनसुद्धा ते या कार्यक्रमात हजर होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु सुदैवानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.