Kolhapur Municipal Corporation Election: इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
सन्मानजनक जागा न मिळाल्याने आम आदमी पार्टीने वेगळा पर्याय निवडत वंचित आघाडीशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरसाठी तिसरी आघाडी निर्माण झाली आहे.

Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू असतानाच आता तिसऱ्या आघाडीची सुद्धा एन्ट्री झाली आहे. कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित येत कोल्हापूर मनपा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आजच ही अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सन्मानजनक जागा न मिळाल्याने आम आदमी पार्टीने वेगळा पर्याय निवडत वंचित आघाडीशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरसाठी तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून ठिणगी पडली आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष हा सुद्धा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र, त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
महायुतीत जनसुराज्य पक्षाला घरचा रस्ता
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जनसुराज्य पक्षाकडून 70 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतींमध्ये महायुतीकडीलही इच्छुक उमेदवार असल्याचा दावा आमदार विनय कोरे यांनी केला होता. मात्र, कोल्हापूर आणि सांगली महापालिकेमध्ये महायुतीमध्ये या पक्षाला एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता महायुतीमधून डावलण्यात आल्यानंतर आमदार विनय कोरे कोणता निर्णय घेणार? याकडे लक्ष आहे.
कृष्णराज महाडिक निवडणूक रिंगणात उतरणार
दरम्यान, महायुतीमध्ये भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. प्रभाग क्रमांक तीनमधून ते नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काल (25 डिसेंबर) त्यांनी मुंबईमध्ये भाजप नेतृत्वाच्या भेटीगाठी केल्यानंतर निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.आज ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, राजकारणात उतरण्याची पहिली पायरी महानगरपालिका आहे. वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहे. नगरसेवक झाल्याशिवाय शहराच्या समस्या कळत नाहीत. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा मी तयारी केली होती. मात्र महायुतीमध्ये कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेचे असल्याने त्या ठिकाणी राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. त्यांचा प्रचार देखील मी ताकतीने केला होता असं त्यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या




















