(Source: Poll of Polls)
CM Eknath Shinde : दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई IIT उपाययोजना सुचवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती; मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याची केली पाहणी
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची पाहणी केली.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई आयआयटी (Mumbai IIT) उपाययोजना सुचविणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. गेल्या आठवड्यात दरड कोसळून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रात्री आडोशी बोगद्याची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पुण्याकडे जाताना मुख्यमंत्र्यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली.
कोसळलेल्या दरडीबाबतच्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नऊ किलो मीटरचे घाट क्षेत्र आहे. या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास आयआयटी मुंबईला सांगितले आहे. त्यांनी काम सुरू केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. दरड कोसळून दुर्घटना घडलेल्या ठिकाणच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संरक्षण जाळी लावली आहे. हा परिसर सुरक्षित केला आहे. कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. ज्या ठिकाणी डोंगराचा भाग धोकादायक असेल तो भाग पाडून त्या ठिकाणी संरक्षक जाळी टाकून हा भाग सुरक्षित करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.