Mumbai Traffic: मुंबई मेरी जॅम! मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची कारणे काय?
Mumbai Traffic: मुंबई आता ट्रॅफिकची तुंबई झाली आहे. एकीकडे विकास काम तर दुसरीकडे ट्रॅफिक जॅम. हे चित्र मुंबईच्या अनेक भागातल्या रस्त्यावर पाहायला मिळतंय.
Mumbai Traffic: मुंबई आता ट्रॅफिकची तुंबई झाली आहे. एकीकडे मुंबईत वाहनांची संख्या मागील पाच वर्षात दहा पटीने वाढलीये. तर दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी, विकास कामांसाठी रस्ते खोदून ठेवल्याने तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने मुंबईतल्या अनेक ठिकाणावरची वाहतूक कासवगतीने सुरू आहे. तर मुंबईतल्या अनेक मार्गावर वाहतूक कोंडीची बेटे तयार झाली आहेत. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी देशातल्या आर्थिक राजधानीत वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे.
एकीकडे विकास काम तर दुसरीकडे ट्रॅफिक जॅम. हे चित्र मुंबईच्या अनेक भागातल्या रस्त्यावर पाहायला मिळतंय. मग ते दक्षिण मुंबई असू द्या किंवा मग पूर्व उपनगर किंवा पश्चिम उपनगर... कुठेही जा ...मुंबई मेरी जॅम... आणि या वाहतूक कोंडीतूनच रोजचा प्रवास मुंबईकरांना करावा लागतोय. 'सरकार योग्य पद्धतीने नियोजन करत नाहीये. त्यामुळे वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी पाहायला मिळते. नुसतं नियोजन करून होणार नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा करायला हवी, असे मत वाहतूक नियोजन तज्ज्ञ रोहित कात्रे यांनी नोंदवलेय.'
मुंबईत मागील पाच वर्षात दहा टक्के वाहनांची संख्या वाढली आहे. सध्या मुंबईत वाहनांचे अधिकृत आकडेवारी 43 लाख इतकी आहे... त्यात पार्किंग करण्यासाठी एकूण जागा सत्तावीस लाख आणि प्रत्यक्षात उपलब्द जागा 60 ते 70 हजार वाहनांसाठी आहे... अशी बिकट स्थिती असताना त्यात रस्त्यावरचे खड्डे, तर दुसरीकडे मेट्रो प्रकल्प, नव्या ब्रिजसाठी व इतर विकास कामांसाठी खोदलेले रस्ते सोबतच रस्त्यांची कमी झालेली रुंदी... या सगळ्यातून वाहन काढताना अगदी कासव गतीने मार्गस्थ व्हावे लागते तर कधी कधी याच ठिकाणाहून वाहतूक कोंडीच्या बेटातून मार्ग काढावा लागतोय.
आता मुंबईतले असे कोणते भाग आहेत जिथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते ?
दक्षिण मुंबईत -
मुखर्जी चौक (रिगल सिनेमा), काळाघोडा, जोहर चौक (भेंडी बाजार), नाना चौक, हाजी अली
दादर वडाळा सायन भागात
हिंदमाता, खोदादाद सर्कल, दादर टीटी, वडाळा ब्रिज, राणी लक्ष्मीबाई चौक (सायन स्थानक)
पूर्व उपनगर-
छेडानगर, अमर महल जंक्शन, चेंबूरनाका, जिजामाता भोसले मार्ग जंक्शन, दत्ता सामंत चौक (साकीनाका), जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, एलबीएस रोड,हिरानंदानी पवई, सी. डी. बर्फीवाला मार्ग (जेव्हीपीडी),
पश्चिम उपनगर-
डी. एन. नगर, चारबंगला, चकाला, बेहराम बाग जोगेश्वरी, आरे कॉलनी, दिंडोशी, समता नगर जंक्शन, इनॉर्बिट मॉल न्यू लिंक रोड यांचा समावेश आहे.
वाहतूक कोंडी होण्याची मुख्य कारणे-
रस्त्यांवरील खड्डे, पायाभूत सुविधांची कामे
मार्गिका कमी असल्याने इतर मार्गिकांवर ताण
वाहन संख्या प्रमाणापेक्षा जास्त
पार्किंग सुविधेची अनुपलब्धता
मुंबईला जर या ट्रॅफिकच्या तुंबईतून सोडवायचा असेल तर तातडीने सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन योग्य पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच पर्यायी मार्ग काढून या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना बाहेर काढायचं आहे ...त्यामुळे योग्य नियोजन आणि त्याची तातडीने अंमलबजावणी हे सूत्र लक्षात ठेवूनच हे काम हाती घ्यावे लागेल. अन्यथा 'मुंबई मेरी जॅम तो भाई कैसे होगा काम' हेच गाऱ्हाणं मुंबईकर रोज ऐकत राहतील.