(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Fire : मुंबईत परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग, पाईपलाईमधील गॅस गळतीमुळे आग लागल्याचा संशय
Mumbai Fire Near Petrol Pump : मुंबईत परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग लागली आहे. महानगर पाईपलाईनमधील गॅस गळतीमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Mumbai Fire Near Petrol Pump in Parel : मुंबईत (Mumbai) परळमध्ये (Parel) पेट्रोलपंपाच्या (Petrol Pump) बाजूला आग लागली आहे. महानगर पाईपलाईनमधील गॅस गळतीमुळे (Gas Leak) आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत होते. त्यानंतर आता ही आग आटोक्यात आली आहे. पेट्रोलपंपाच्या जवळ महानगर गॅसची पाईपलाईन असून त्या पाईपलाईनमधून गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता महानगर गॅसचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील काही दुकानांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच परिसर रिकामा करण्याचं आवाहन केलं जात आहे. आजूबाजूची काही दुकान बंद करण्यात आली आहेत. परिसरातील लोकांना घराची दारे-खिडक्या बंद करण्यास सांगण्यात आलं आहे.
मुंबईच्या परळ येथील टिटी स्लीप रोडवरील एचपी पेट्रोलपंपाच्या बाहेर ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आता ही आग अद्याप आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते, अखेर त्यांना यश मिळालं आहे. मात्र पाण्याच्या फवाऱ्याने ही आग आटोक्यात येईल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत होती. पण आता आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेचे (BMC) कर्मचारी यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. लोकप्रतिनिधीही घटनास्थळी दाखल झाले होते.
महानगर गॅस लिमिटेडचा खुलासा
घटनेच्या स्थळी एमजीएलची आपत्कालीन टीम पोहोचली. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं एमजीएलने स्पष्ट केलं. खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या इमारतीत गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. अग्निशमन दलाची परवानगी मिळाल्यानंतर पुरवठा पूर्ववत केला जाईल असंही एमजीएलकडून सांगण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ : परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग
परिसरातील वाहतूक वळवली
गॅसगळती झाल्यामुळे परळमधील टिटी स्लीप रोड, एसबी रोड येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या ठिकाणची वाहतूक बांबू गल्ली, सेंट झेवियर्स मार्ग, हिंदमाता कडे वळविण्यात आली आहे.
गॅसगळती झाल्यामुळे परेल टिटी स्लीप रोड, एसबी रोड येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सदर ठिकाणची वाहतूक बांबू गल्ली, सेंट झेवियर्स मार्ग, हिंदमाता कडे वळविण्यात आली आहे.#वाहतूक_सूचना #MumbaiTrafficUpdateTraffic
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 29, 2022
लोकप्रतिनिधींकडून दुर्घटनेच्या चौकशीची मागणी
परळमधील पेट्रोलपंपासमोर लागलेल्या आगीवर अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. त्यानंतर आता लोकप्रतिनिधींकडून या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. आग लागलेला परिसर अत्यंत गजबजलेला असतो. त्यामुळे आगीमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. माजी नगरसेविका पांचाळ यांनी महानगरपालिकेकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या