Mumbai Fire : मुंबईतील झवेरी बाजारमधील पाच मजली इमारतीला भीषण आग, जीवितहानी नाही; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु
रात्री दी़ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील झवेरी बाजार (Zaveri Bazaar) येथील चायना बाजार इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली.
Mumbai Fire News : मुंबईतील झवेरी बाजार (Zaveri Bazaar) येथील चायना बाजार इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीत अडकलेल्या 50 ते 60 लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.
झवेरी बाजार येथील चायना बाजार इमारत ही पाच मजली आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या इमारतीला आग लागली. यामध्यो कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत. सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग विझवण्यासाठी क्रेनचाही वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या आणखी एका भागात कूलिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भीषण आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग आणि जिन्यांचा काही भाग कोसळला आहे. सर्वजण सुरक्षित आहेत.