Gas Cylinder Blast : दादरच्या छबीलदास सभागृहामध्ये भीषण आग; पहाटे पाचला गॅस सिलेंडरचा स्फोट
Mumbai Dadar Gas Cylinder Blast: दादरमध्ये झालेल्या या एलपीजी सिलेंडर स्फोटामध्ये तीन जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींवर जवळील सायन रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे.
मुंबई: मुंबईच्या दादरच्या पश्चिम भागातील छबीलदास सभागृहामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास एलपीजी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट (Mumbai Dadar Gas Cylinder Blast) होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
एकीकडे गॅस स्फोटाच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. दुसरीकडे अनेकदा गॅस लीक (Gas Leak) किंवा गॅसचा चुकीच्या वापरामुळे अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. एलपीजी सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
दादरमध्ये झालेल्या या एलपीजी सिलेंडर स्फोटामध्ये तीन जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींवर जवळील सायन रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे. मात्र हा सिलेंडर स्फोट कशामुळे झाला याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत.
गॅस वापरताना काळजी घ्या...
घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधा.