(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aryan Khan Drugs Case : ...म्हणून आर्यन खानची एनसीबीच्या SIT चौकशीला दांडी; आज तरी उपस्थित राहणार?
Mumbai Cruise Drug Case : आर्यन खानला काल (रविवारी) चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी एनसीबीनं समन्स बजावलं होतं. पण आर्यन चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. यावरुन सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी रविवारी एनसीबीच्या एसआयटीनं बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. परंतु, आर्यन खान (Aryan Khan) काल (रविवारी) चौकशीसाठी हजर राहिला नाही. एनसीबीनं आर्यन खानला रविवारी संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान, चौकशीसाठी हजर राहून आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले होते. पण तरिही आर्यन खान गैरहजर राहिला. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबी (NCB) च्या रडारवर असलेला आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या होत्या. या अटींचं पालनं करणं आर्यनसाठी बंधनकारक असणार आहे. यातील एक अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे, आर्यननं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करावं. जर आर्यननं या अटींची पूर्तता केली नाही, तर मात्र आर्यनचा जामीन रद्द होऊ शकतो. असं असलं तरीही आर्यननं काल (रविवारी) एनसीबी कार्यालयात चौकशीला जाणं टाळलं. यावरुन सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय की, आर्यन चौकशीसाठी का उपस्थित नव्हता? याचं कारण आता समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानला थोडा ताप होता. त्यामुळं त्यांनं एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणं टाळलं. आर्यन खानच्या मॅनेजर्सनं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नाहीत, परंतु, आशा आहे की, सोमवारी (आज) आर्यन खान चौकशीसाठी उपस्थित राहिल. दरम्यान, काल (शनिवारी) अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांची एनसीबीच्या एसआयटीनं चौकशी केली. दोघेही संध्याकाळी साडेचारच्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाले होते.
एनसीबीचं म्हणणं काय?
एनसीबीच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीनं आर्यन खानला आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. परंतु, आर्यननं ताप आल्याचं सांगत चौकशीसाठी उपस्थित राहणं टाळलं. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचं पथक शनिवारी मुंबईत दाखल झालं होतं. त्यानंतर एक दिवसांनी एसआयटीकडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह सहा प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला.
एनसीबीनं गेल्या महिन्यात मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि कमीत कमी 19 जणांना अटक केली होती. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची विभागीय दक्षता चौकशी सुरु आहे. कारण या प्रकरणात एका स्वतंत्र पंचानं तपासात सहभागी असलेल्यांवर खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर असून मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आर्यनला एनसीबीनं 2 ऑक्टोबर रोजी रात्री कॉर्डेलिया क्रूझवरुन ताब्यात घेतलं होतं. त्याच्या पुढच्याच दिवशी आर्यनला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह इतरही लोकांना अटक केली होती.