मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण; एनसीबीचं SIT पथक अॅक्शन मोडमध्ये, अनेक नावं रडारवर
Aryan Khan Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. दिल्लीहून मुंबईत दाखल झालेलं एनसीबीचं SIT पथक अॅक्शन मोडमध्ये असून चौकशीचा सपाटा लावला आहे.
Aryan Khan Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 6 प्रकरणांची चौकशी एनसीबीचं एसआयटी पथक करणार आहे. रविवारी प्रकृती ठिक नसल्याची सबब देत आर्यन खान एनसीबी चौकशीला गौरहजर राहिला. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचं पथक शनिवारी मुंबईत दाखल झालं होतं. त्यानंतर एक दिवसांनी एसआयटीकडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह सहा प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला आहे.
प्रभाकर शैलला एनसीबीकडून तपासासाठी समन्स
एकिकडे एसआयटीनं या मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरु केली आहे. क्रूझ प्रकरणातील आर्यन खानला रविवारी एसआयटीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु, प्रकृती ठिक नसल्याची सबब देत आर्यन चौकशीसाठी गैरहजर राहिला. आर्यनची प्रकृती ठिक असेल तर आज आर्यन खान चौकशीसाठी उपस्थित राहू शकतो.
तर दुसरीकडे, एनसीबीच्या एसआयटीनं क्रूझ ड्रग प्रकरणी रविवारी आरोपी अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांचा जबाब नोंदवला. एसआयटी ज्या 6 प्रकरणांचा तपास करत आहे. त्यामध्ये जेवढे आरोपी आहेत, सर्वांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. या 6 प्रकरणांमध्ये आर्यन खान, समीर खान, अरमान कोहली, मुंब्रा येथील प्रकरण ज्यामध्ये MD ड्रग्स जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच जोगेश्वरी येथील प्रकरण ज्यामध्ये 1 किलो चरस जप्त करण्यात आलं होतं.
दरम्यान, या 6 प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीचं पथक दिल्लीहून मुंबईला पोहोचलं आहे. या पथकात 13 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाचं नेतृत्व संजय सिंह करत आहेत. या पथकात एक AD, दोन SP, 10 IO आणि JIO आहेत. दुसरीकडे एनसीबी अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी करण्यासाठीही एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी समीन वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. एनसीबीचं आणखी एक पथक याच प्रकरणी आपला तपास पुढे सुरु करणार आहे.
...म्हणून आर्यन खानची एनसीबीच्या SIT चौकशीला दांडी
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी रविवारी एनसीबीच्या एसआयटीनं बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. परंतु, आर्यन खान (Aryan Khan) काल (रविवारी) चौकशीसाठी हजर राहिला नाही. एनसीबीनं आर्यन खानला रविवारी संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान, चौकशीसाठी हजर राहून आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले होते. पण तरिही आर्यन खान गैरहजर राहिला. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबी (NCB) च्या रडारवर असलेला आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या होत्या. या अटींचं पालनं करणं आर्यनसाठी बंधनकारक असणार आहे. यातील एक अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे, आर्यननं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करावं. जर आर्यननं या अटींची पूर्तता केली नाही, तर मात्र आर्यनचा जामीन रद्द होऊ शकतो. असं असलं तरीही आर्यननं काल (रविवारी) एनसीबी कार्यालयात चौकशीला जाणं टाळलं. यावरुन सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय की, आर्यन चौकशीसाठी का उपस्थित नव्हता? याचं कारण आता समोर आलंय.