Mumbai Crime : दहिसरमध्ये उनाड तरुणांचा धिंगाणा, प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
Mumbai News : काही उनाड तरुणांनी बेस्ट बसवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या दगडफेकीत बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याचंही समजतं. तसंच बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
Mumbai News : काही उनाड तरुणांनी बेस्ट बसवर (BEST Bus) दगडफेक (Stone Pelting) केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील दहिसर पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील हॉटेल पायलजवळ हा प्रकार घडला. या दगडफेकीत बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याचंही समजतं. तसंच बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दहिसर चेक नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्ट बसवर या तरुणांनी सोमवारी (14 नोव्हेंबर) रात्री दगडफेक केली. या तरुणांविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन जणांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु झालं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवाशांना घेऊन निघालेली बेस्टची बस दहिसर टोल नाक्याच्या दिशेने जात असताना एका कारला बसचा धक्का लागला. यानंतर त्या कारमधील तरुणांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांना बोलावून बस चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी सहा ते सात तरुणांनी बसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत बसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बसच्या समोरील काचा आणि खिडक्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर बसवर झालेल्या दगडफेकीत काही प्रवासी देखील जखमी झाले असल्याचं समजतं. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन तरुणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहे.
पुण्यात पीएमपीएल बस चालक आणि दुचाकीस्वारामध्ये तुंबळ हाणामारी
पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना पुण्यातील स्टेशन परिसरात रविवारी (13 नोव्हेंबर) समोर आली होती. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये वाद झाला होता आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात दुचाकी चालकाने पीएमपीएमएलच्या चालकाला चपलेने बेदम मारहाण केली. त्यानंतर वाहकाने हा प्रकार पाहिला आणि वाहक देखील बसच्या खाली उतरला. त्याने देखील मारहाण करायला सुरुवात केली. त्या वाहकाला देखील दुसऱ्या तरुणाने मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी शेजारचे लोक त्याठिकाणी बचावासाठी आले, मात्र दोघेही थांबायला तयार नसल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.
संबंधित बातमी
बुलढाण्यात बसस्थानकात उभी असलेली बस चक्क गेली चोरीला, एसटी बस चालकाकडून पोलिसात तक्रार