Mumbai Crime News : पोलिसांचा वेश परिधान करुन फसवणूक, टॅक्सी चालक बनला गुन्हेगार, सोशल मीडियावर करायचा हवा!
मुंबई पोलिसांनी विजय डुंबरे या तरुणाला अटक केली आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसं कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही. विजयला पोलीस व्हायचं होतं मात्र तो होऊ शकला नाही म्हणून त्यांनी चक्क पोलीसांची वर्दी शिवली, पोलीस दलाचं खोटं ओळखपत्र बनवलं आणि स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोलीस म्हणून शेअर करू लागला.
मुंबई : आजकाल फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. मात्र पोलिसांना चकवा देत त्यांचंच रुप घेऊन एका तरुणानं काही सरकारी अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी विजय डुंबरे या तरुणाला अटक केली आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसं कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही. विजयला पोलीस व्हायचं होतं मात्र तो होऊ शकला नाही म्हणून त्यांनी चक्क पोलीसांची वर्दी शिवली, पोलीस दलाचं खोटं ओळखपत्र बनवलं आणि स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोलीस म्हणून शेअर करू लागला.
पोलीस बनण्याचं विजयला इतकं वेड होतं की, इतर वेळेला सुद्धा पोलिसांचीच वर्दी घालून फिरायचा. इतकंच नाही तर पोलिस दलात आणि सैन्यदलात काम करणाऱ्यांची फसवणूक सुद्धा सुरू केली. विजय घुंडरेचं पोलीस बनायचं स्वप्न होतं. मात्र ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही आणि विजयला टॅक्सी चालक म्हणून काम करावं लागलं. मात्र पोलिस बनण्याचे खूळ त्याच्या डोक्यातून काही गेलं नाही. ज्यासाठी विजयने एक शक्कल लढवली. स्वताचे पोलीस गणवेशात असलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू लागला आणि स्वतःला पोलीस म्हणून मिरवायला लागला. इतकंच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक सुद्धा करू लागला.
विजय घुंडरे हा नवी मुंबईचा राहणारा असून एक टॅक्सी चालक आहे. आपल्या टॅक्सीच्या पुढे त्याने पोलीस अशी पाटीही लावली होती. इतकंच नाही तर जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा त्यांनी पोलीस दलातील QRT दलाचा गणवेश घातला होता. पोलिस तपासात समोर आलं आहे की, विजय फक्त खोटा पोलीस बनला नाही तर त्यांनी पोलीस बनवून एका सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला आणि मुंबई पोलिस दलाच्या अधिकाऱ्याला सुद्धा गंडा घातला आहे. गाडी घ्यायची आहे असे सांगून सैन्यदलाच्या अधिकार्याकडून 50 हजार रुपये आणि मुंबई पोलिस दलाच्या अधिकार्याकडून 20 हजार रुपये घेतले. त्याने अजून किती लोकांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
आतापर्यंत विजयकडून फसवणूक झालेल्यांपैकी दोन लोकं समोर आली आहेत. मात्र हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सुद्धा लोकांना आवाहन केले आहे की ज्या कोणाची अशी फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी.