Mumbai Lockdown : मुंबईचा आकडा वाढताच, काय निर्बंध लागू शकतात?
Mumbai Coronavirus Lockdown Update : मुंबईत तिसरी लाट धडकली? दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच. हे निर्बंध लागू शकतात.
Mumbai Coronavirus Lockdown Update : मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनानं मुंबईची काळजी वाढवली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोना रुग्णांचा उद्रेकच होत आहे. मुंबईतील नव्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत 20 हजार 181 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्यानं नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आढळल्यास मुंबईत निर्बंध कठोर करण्यात येतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मुंबईत 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने आता लॉकडाऊन लावलं जाईलं का? असा प्रश्न समोर येत आहे.
मुंबईचा कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढणारा आकडा पाहता, प्रशासनाकडून मुंबईतील निर्बंध कठोर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईती निर्बंधांबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. धोक्याची पातळी ओलांडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंधाबाबत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय जाहीर करतील, असं महापौर पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोणते निर्बंध लागू करण्यात येऊ शकतात. यासंदर्भात एबीपी माझाला सुत्रांनी माहिती दिली आहे. पूर्णतः लॉकडाऊन नाही, परंतु झपाट्यानं वाढणारा आकडा पाहता, मुंबईत कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ : संध्याकाळी 7 पर्यंत CM Uddhav Thackeray निर्णय घेण्याची शक्यता
मुंबईत निर्बंध काय लागू शकतात?
- विकेंन्ड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचा विचार
- बाजारपेठा आणि दुकानांच्या वेळा ठरवून दिल्या जाऊ शकतात
- वर्क फ्रॉर्म होमवर भर दिला जाऊ शकतो
- धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाबाबत कडक नियमावली तयार होऊ शकते
- कामाव्यतिरिक्त लोकांना बाहेर पडण्यावर निर्बंध लागण्याची देखील शक्यता
संपूर्ण लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, पण... : महापौर
आजच्या घडीला संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, पण मुंबईच्या नागरिकांनी गांभीर्यानं नियमांचं पालन करावं असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. गंभीर रुग्णांसाठी 22 हजारांचे बेड्स राखीव ठेवले आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी देखील काही बेड्स राखीव ठेवले आहेत. मात्र, सध्या बाधित असलेल्या रुग्णांना लक्षणे दिसत नाहीत. सध्या रुग्णालयात 1 हजार 170 रुग्ण आहेत. रुग्णांची टक्केवारी वाढली तर निर्बंध वाढवावे लागतील. घाबरण्यापेक्षा काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या संकटापासून जनतेला कसे वाचवता येईल याचाच विचार करत आहेत. यासाठी ते तज्ञांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचे पेडणेकर यांनी केले. संपूर्ण लॉकडाऊन नक्कीच होणार नाही, मात्र काही नागरिक बेफिकीरीनं वागत राहिले तर संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. त्यासाठी निर्बंधात वाढ करावी लागले असेही त्या म्हणाल्या. सध्या डॉक्टर, बेस्ट कर्मचारी बाधित होत आहेत. सध्या बेड्स रिकामे आहेत, त्यामुळे काही निर्णय घेत नाही आहोत असे त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Lockdown : तिसरी लाट धडकली? मुंबईकरांनो पुढील आठवडा जिकरीचा; रुग्णसंख्येत 20 ते 30 टक्क्यांची वाढ
- संपूर्ण लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, पण नियमांचे पालन करणे गरजेचं : महापौर किशोरी पेडणेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह