(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Lockdown Update: आज राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता; कोरोना लॉकडाऊनबाबत अस्लम शेख यांचं लक्षवेधी वक्तव्य
ठाकरे सरकार मागील बऱ्याच दिवसांपासून बैठकांची सत्र घेत आहे. टास्क फोर्सपासून ते सर्वपक्षीय बैठकीपर्यंत सर्वत्रच लॉकडाऊनचीच चर्चा पाहायला मिळाली.
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता, राज्य शासनानं बैठकींची सत्र सुरु केली आणि आता शासनाकडून गुढी पाडव्याच्याच दिवशी मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची चिन्ह आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. शिवाय येत्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचाचं सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं अधिक वेळ न दवडता आता अंतिम निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत अस्लम शेख यांनी दिले.
नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असा विश्वास देत शेख यांनी शासनाकडून नवी एसओपी लागू करण्यात येण्याची बाब स्पष्ट केली. मागील लॉकडाऊनच्या वेळी अचानकच काही निर्णय घेतले गेल्यामुळं काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी कोरोनापेक्षाही परिस्थितीचा अधिक त्रास नागरिकांना झाला होता. त्यामुळं त्या चुका टाळण्याबाबतही यंत्रणांमध्ये चर्चा झाल्याचं ते म्हणाले.
सण- उत्सवांच्या उत्साहावरही काही मर्यादा आल्या आहेत. पण, नादरिकांनी सध्या पिरिस्थिती पाहता कोरोना काळात नियमांचं पालन करणं अपेक्षित असल्याचं म्हणत हे नियम तात्पुरते असून, त्यांचं योग्य पद्धतीनं पालन झाल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल असा सूर आळवला.
मुंबईत कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता सध्याची स्थिती पाहता बेड्सची संख्या वाढवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी स्थलांतरित मजूर, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक या सर्व घटकांचा विचार करतच शासन निर्णय़ घेणार असल्याची माहिती देत त्यांनी राज्यातील कोरोना चाचणीच्या आकड्याकडे लक्ष वेधलं. बाहेरील ठिकाणहून मुंबईत येणाऱ्यांवरही निर्बंध लागणार असल्याचा इशारा शेख यांनी दिला. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यामुळं होणाऱ्या कोरोना विस्फोटाची भीतीही व्यक्त केली.
परप्रांतीयांबाबत म्हणाले...
परप्रांतीयांनी सध्या पुन्हा एकदा गावच्या वाटा धरल्या आहेत, त्यासाठी दोन कारणं असल्याचं अस्लम शेख म्हणाले. 'सध्या पावसाचे दिवसही जवळ येणार आहेत. त्यामुळं काहीजण हे शेतीच्या कारणामुळं परत जात आहेत. शहरात जेव्हा निर्बंध येत होते, त्या परिस्थितीतही मुंबईत रेल्वे, बस, रिक्षा या सेवा सुरुच ठेवण्यात आल्या होत्या.'
सेलिब्रिटी मंडळींनी अडवले रुग्णालयातील बेड
मोठमोठ्या सेलिब्रिटींना ते असिम्प्टमॅटिक असल्याचं सांगूनही त्यांनी रुग्णालयात जाऊन बेड अडवले. मोठमोठ्या खेळाडू, क्रिकेटर यांनीही रुग्णालयात बेड मिळवले. त्यामुळं खरंच गरज असणाऱ्या रुग्णांना काही सेवांपासून मुकावं लागलं, असं म्हणत शेख यांनी महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला.