(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मिलिंद देवरा यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीच्या आधी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर 26 जून रोजी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन मिलिंद देवरा यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मजबूत करण्यासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वरिष्ठ नेत्यांचं सामूहिक नेतृत्व असलेली समिती स्थापना करण्याची शिफारस त्यांनी केली आहे.
मुंबई काँग्रेसला योग्य दिशा देणे आणि संघटीत ठेवण्याचं काम करत राहणार असल्याचंही मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केलं. मिलिंद देवरा यांच्या कार्यालयाने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात काँग्रेससाठी भाजपा-शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावाचा सामना करणे हे काँग्रेससाठी एक मोठे आव्हान आहे.
Mumbai Congress President Milind Deora tenders his resignation from his post. He has also proposed a three member panel to lead Mumbai Congress for the upcoming Maharashtra Assembly elections. (file pic) pic.twitter.com/aPmfaF1LCt
— ANI (@ANI) July 7, 2019
मिलिंद देवरा यांनी 26 जून रोजी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.
काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय स्थिती बदलली आहे. त्यामुळे आम्हाला परिस्थितीनुसार योग्य भूमिका घ्यावी लागणार आहे, असंही मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मिलिंद देवरा यांनी मुबंई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला.
The idea to appoint 3 member committee to run Mumbai Congress in place of President is not at all appropriate. It will ruin the party further.
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 7, 2019
सामूहिक नेतृत्वाच्या शिफारशीला संजय निरुपम यांचा विरोध
मिलिंद देवरा यांच्या सामूहिक नेतृत्वाच्या शिफारशीला माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी विरोध दर्शवला आहे. तीन जणांच्या समितीने पक्ष चालवला तर पक्षाचे अधिक नुकसान होईल, असा दावा निरुपम यांनी केला आहे.