थेट सीबीआय... पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक, 5 दिवसांची पीसी
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लोअर परळ येथील पारपत्र सेवा केंद्र म्हणजेच पासपोर्ट कार्यालयातील कार्यालय सहाय्यक आणि एका दलालाला भष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अटक केली.

मुंबई : राज्यात एसीबीने भ्रष्टाचारविरोधी (Corruption) मोहिम हाती घेत लाच घेणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून 5 लाखांची लाच स्वीकारताना अटक केली. तर, रत्नागिरी जिल्ह्यातही महसूल विभागातील तीन जणांना लाच घेताना रंगेहात अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे राज्यात एसीबीने लाचखोर अधिकाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली असताना दुसरीकडे सीबीआयने देखील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील (Mumbai) लोअर परळ येथील पासपोर्ट कार्यालयातील एका अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक करत सीबीआने लाचखोरांना दणका दिला आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लोअर परळ येथील पारपत्र सेवा केंद्र म्हणजेच पासपोर्ट कार्यालयातील कार्यालय सहाय्यक आणि एका दलालाला भष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अटक केली. त्यांच्यावर बनावट कागदपत्रांवर आधारित पारपत्र (पासपोर्ट) काढून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. आरोपींनी अनेक पारपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवल्याचा आरोप आहे. तसेच, 7 बनावट पारपत्र अर्ज सीबीआयला सापडले आहेत. सध्या त्यांची पडताळणी सुरू आहे. कनिष्ठ पारपत्र सहाय्यक अक्षय कुमार मीणा व दलाल भावेश शांतीलाल शहा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मीणा हे कनिष्ठ पारपत्र सहाय्यक असून लोअर परळ येथील पारपत्र सहाय्यक केंद्रावर पडताळणी अधिकारी म्हणून काम करत होते. सीबीआयाने या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, 2023-24 या काळात संबंधित मीणा व खासगी दलला शहा यांनी संगनमत करून कट रचला होता. दोघेही पारपत्र मिळवून देण्यासाठी लाच घेत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने अधिक तपास केला. त्यावेळी महत्त्वाची माहिती त्यांच्या हाती लागली. आरोपींना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले असून, 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता, न्यायालयाच्या आदेशानुसार दोघेही 2 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहे.
उपजिल्हाधिकारी अटकेत
ल विभागात सर्वसामान्यांना सातत्याने पैशाची मागणी केली जाते, कुठलेही काम करण्यासाठी पैसाच द्यावा लागतो अशी ओरड कायम असते. विशेष म्हणजे कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका निवासी उपजिल्हाधिकाऱ्यास एसीबीने रंगेहात अटक केली. या महाशयांनी तब्बल 41 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी, 23 लाख रुपये त्यांना पोहोचलेही होते. अखेर, 5 लाख रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.
























