(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yogi Adityanath: मुंबईतील उद्योगांवर योगी आदित्यनाथ यांचा डोळा?
Yogi Adityanath: आता मुंबईतील प्रकल्प उत्तर प्रदेशला जाणार का? हा प्रश्न उपस्थित कऱण्याचं कारण आहे योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा...
Yogi Adityanath: मुंबई दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि गोरखपूरचे खासदार रवि किशन हेही उपस्थित होते. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. योगींनी उत्तर प्रदेशातल्या फिल्मसिटीबाबत अक्षयशी चर्चाही केली.
मुंबईतील उद्योगांवर योगींचा डोळा?
महाराष्ट्रात उभारला जाणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प यापुर्वीच गुजरातला गेला आहे. आता मुंबईतील प्रकल्प उत्तर प्रदेशला जाणार का? हा प्रश्न उपस्थित कऱण्याचं कारण आहे योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा... उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी योगींचा मुंबई दौरा आयोजित कऱण्यात आला आहे. उत्तर प्रदेशला अच्छे दिन यावे यासाठी मुंबई दौऱ्यावर आलेले योगी आदित्यनाथ विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी अजित पवार यांनी टीकास्त्र सोडलेय.
मुंबई दौऱ्यात योगी आदित्यनाथ कुणाला भेटणार?
टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, महिंद्रा बाँबे डाइंग, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स,हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी आणि ओस्वाल इंडस्ट्रीज यासह अनेक बड्या उद्योगपतींची भेट योगी आदित्यनाथ घेणार असल्याचं समजतंय.
योगी आदित्यनाथ 17 बैठका घेणार
सीएम योगींच्या कार्यक्रमवेळा पत्रकानुसार, रोड शोच्या आधी आणि नंतर मुख्यमंत्री विविध उद्योगपतींसोबत वन टू वन बैठक घेणार आहेत. ही बैठक बिझनेस टू गव्हर्नमेंट (बीटूजी) या तत्त्वावर असेल. वेळापत्रकानुसार एकूण 17 बीटूजी बैठका होणार आहेत. रोड शोपूर्वी ते आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल एंटरप्राइझ लि.चे अध्यक्ष अजय पिरामल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल, टोरेंट पॉवरचे एमडी जिनल मेहता आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांची भेट घेतील. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन, पार्ले अॅग्रोचे चेअरमन प्रकाश चौहान आणि एमडी शवना चौहान, अदानी पोर्ट्स लि.चे करण अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ मुकेश अंबानी आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांच्याशीही ते चर्चा करतील.
एका दगडात दोन पक्षी मारणार योगी आदित्यनाथ -
मुंबईसारखंच उत्तर प्रदेशलाही चंदेरी तेजाची दुनिया करण्याचा योगींचा प्लॅन आहे. आणि म्हणूनच या दौऱ्यादरम्यान ते काही निर्माते, दिग्दर्शकांचीही भेट घेवू शकतात. हा झाला उत्तर प्रदेशसाठीचा योगींचा दौरा, पण या दौऱ्यादरम्यान ते मुंबई पालिकेचाही प्रचार करु शकतात. कारण मुंबईत उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे. आणि त्याच उत्तर भारतीय मतदारांना भाजपकडे वळवण्याचा डाव ते या दौऱ्यात साधू शकतात. त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा योगींचा हा दौरा आहे असंच दिसतंय.