अभिनेता, उद्योजक सचिन जोशीचा जामीन हायकोर्टाकडून रद्द
मनी लॉन्ड्रिंग तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेता व उद्योगपती सचिन जोशी याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेता व उद्योगपती सचिन जोशी याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सचिन जोशी याला मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केलेला जामीन न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी रद्द करत याप्रकरणी तपासयंत्रणेनं दाखल कलेली याचिका योग्य असल्याचं म्हणत ती स्वीकारली आहे.
सुमारे 22 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमल बजावणी संचनालयानं (ईडी) ओमकार ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा तसेच अध्यक्ष कमलनाथ गुप्ता यांना अटक केली होती. ओमकार बिल्डर्सने येस बँकेतून घेतलेलं 440 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचेही आरोप ईडीनं यासर्वांवर ठेवले आहेत. या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप ठेवत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं सचिन जोशी याला फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं सचिन जोशीला जामीन मंजूर केला. ईडीने याविरोधात तातडीनं हायकोर्टात धाव घेत त्यावर स्थगिती मिळवली होती. त्यानंतर या अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.
कोरोना काळाचा फायदा घेत आजारपणाच्या मुद्यावर मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मिळवला
सचिन जोशीनं कोरोना काळाचा फायदा घेत आजारपणाच्या मुद्यावर मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मिळवला. मात्र त्याची कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली नसतानाही त्याचा अर्ज मंजूर करण्यात आला, असा दावा अंमलबजावणी संचनालयच्यावतीने बाजू मांडताना अँड हितेन वेनेगावकर यांनी हायकोर्टात केला. तसेच त्याचा जामीन फेटाळून लावण्याची विनंतीही ईडीतर्फे केली गेली. न्यायालयाने याची दखल घेत सचिन जोशी याला कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्याचा जामीन फेटाळून लावला. सचिन जोशी याला कोविडची लागण झाली असल्यानं आर्थर रोड जेलच्या कोविड केअर सेंटर मध्येच त्याच्यावर उपचार करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.