BMC Election : शिवसेना-भाजपच्या युतीचं तर ठरलं, पण जागावाटपाचं काय? सेनेच्या 50-50 वर भाजपची भूमिका काय?
BJP Shivsena Alliance : मुंबई महापालिकेसाठी भाजपने 150 हून अधिक जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे, तर शिंदेंची शिवसेना 100 हून अधिक जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे.

मुंबई : राजकारणात एरव्ही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं चित्र असतं. पण नुकतेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मात्र महायुतीतील सत्ताधारी पक्षच एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं. त्यांच्यातील अनेक रुसवे फुगवे, आरोप प्रत्यारोप, उमेदवारांची खेचाखेची सुद्धा आपण पाहिली. मात्र आता महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election) भाजप आणि शिवसेना पुन्हा जवळ येत आहे. युतीचा फॉर्म्युला जवळजवळ ठरल्याचं सांगितलं जात आहे.
नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या सोबत असल्याचं चित्र सर्वांनी पाहिलं. ते एकत्र कॉफी घेत होते, एकत्र बसून चर्चा करत होते, एकत्र फिरतही होते. ही दृश्यं इतकी महत्त्वाची आहेत की खास माध्यमांसाठीच दिली आहेत का अशी शंकाही अनेकांच्या मनात आली.
Devendra Fadnavis Eknath Shinde : दोन्ही नेते पुन्हा एकत्र
भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये, फडणवीस आणि शिंदे या दोन नेत्यांमध्ये पुन्हा सारं काही आलबेल असल्याचे हे संकेत आहेत. अधिवेशन काळात आणि अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा या दोन नेत्यांनी ते जाणवून दिलं आहे. शिंदे-फडणवीसांनी रेशीमबागेत डॉ. हेडगेवारांच्या स्मृतीस्थळावर एकत्र दर्शन घेतलं, एवढंच नाही तर नंतर एकत्र कॉफी सुद्धा घेतली. नंतर एकत्रच बाहेरही पडले
आगामी मुंबई-ठाणे-नाशिक-पुणे सारख्या महानगर पालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी हा सिग्नल, मेसेज, संकेत दिल्याचं बोललं जात आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. एकमेकांच्या पक्षातूनच नेत्यांची खेचाखेच सुरु झाली आणि कटुता आणखी वाढली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली जवळ केली होती, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत, महाराष्ट्र भाजपची तक्रारही केल्याची माहिती समोर आली. दोन्ही मित्रपक्षांनी नगरपालिका निवडणूक एकमेकांविरोधात अतिशय त्वेषाने लढवली. त्यावेळी युती तुटते की काय असं वातावरण काही काळासाठी झालं होतं.
भाजप आणि शिवसेनेमधील वाद पाहून मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, मतदान पार पडलं तसं निवडणुकीचा आणि वादाचा ज्वर ओसरला. आता दोन्ही पक्षांनी सबुरीने घेण्याचं ठरवल्याचं कळतंय.
BMC Election : एकत्र येणार, पण जागावाटपाचं काय?
सेना-भाजपने महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून लढवणार हे जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. असं असलं तरी आता जागा वाटपावरून पुन्हा एकदा शिंदे आणि भाजपमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिंदे सेनेला अधिक जागा देण्यासाठी तयार होणार का? हा मोठा प्रश्न असेल. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून फिफ्टी-फिफ्टीचा प्रस्ताव देण्यात आल्याचं कळतंय.
एमएमआर म्हणजे मुंबई महानगर परिसरामध्ये जागावाटपासाठी शिवसेना फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्यासाठी आग्रही असेल. ज्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते त्या जागा आपल्याकडे ठेवण्याचा शिवसेना प्रयत्न करेल. शिंदेंकडे असे 125 नगरसेवक आहेत. त्यातील किती नगरसेवकांना तिकिट मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.
जागा वाटपाच्या चर्चा करण्यासाठी महायुतीचा मुहूर्त सुद्धा ठरल्याची माहिती आहे. मुंबईच्या जागांसाठी येत्या दोन दिवसांत पहिली बैठक पार पाडणार आहे. यामध्ये भाजपकडून चार तर शिवसेनेकडून सहा नेते चर्चेसाठी येतील. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष जोर लावतील. मुंबईत भाजपकडून 150 जागांवर लढण्याची तयारी केली आहे. तर शिवसेना सुद्धा शंभरहून अधिक जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुका एकसंघपणे लढून जिंकून दाखवल्यानंतर सरकारमधील दोन पक्षात सतत धुसफूस पाहायला मिळतेय. मुंबई-ठाणे महानगरपालिका दोघांसाठीही महत्त्वाच्या आहेत, मात्र दोघांनाही जागावाटपात आपला वरचष्मा राखायचा आहे. अशावेळी दोघांच्या भांडणात ठाकरेंना फायदा होईल की सेना-भाजप मतभेद विसरुन एकदिलाने लढतील याकडे आपलं लक्ष असेल.
ही बातमी वाचा:























