सिग्नलवर बाचाबाची, मुजोर रिक्षाचालकाची भर रस्त्यात दुचाकीस्वाराला जोरदार धडक
मुंबईतील घाटकोपरमध्ये सिग्नलवर दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकाचा वाद झाला. यानंतर सिग्नल सुटल्यावर रिक्षाचालकाने संबंधित दुचाकीस्वाराला भर रस्त्यातच जोरदार धडक दिली. दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार बचावला. ही संपूर्ण घटना मागील गाडीतील कॅमेऱ्यात कैद झाली
मुंबई : मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात रिक्षाचालका मुजोरी पाहायला मिळाली. सिग्नलवर दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकाचा वाद झाला. यानंतर सिग्नल सुटल्यावर रिक्षाचालकाने संबंधित दुचाकीस्वाराला भर रस्त्यातच जोरदार धडक दिली आणि पळ काढला. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वार खाली पडला. दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. ही संपूर्ण घटना एका कारच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओच्या आधारे पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. ही घटना 17 डिसेंबरची असल्याचं कळतं.
दुचाकीस्वार घाटकोपर पूर्व राहतो. कामानिमित्त नवी मुंबईच्या दिशेने जात असताना, गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ईस्टर्न फ्रीवेवर रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात सिग्नलजवळ बाचाबाची झाली. यानंतर सिग्नल सुटल्यावर सर्व गाड्या भरधाव वेगाने निघाल्यानंतर रिक्षाचालकाने दुचाकीच्या पुढच्या टायरला धडक दिली. धडक जोरदार असल्याने दुचाकीस्वार मोठ्या रस्त्यावर पडला. सुदैवाने मागून येणाऱ्या गाड्यांनी वेळीच ब्रेक लावल्याने त्याचा जीव वाचला.
हा सर्व प्रकार मागच्या गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झाला. गेल्या दोन दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या आधारेच देवनार पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराला संपर्क करुन तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे. आता पोलीस रिक्षाचालकावर कोणती कलमं लावतात हे पाहावं लागेल.
रिक्षाचालकांच्या मुजोरीबाबत वारंवार तक्रारी येत असतात. गोवंडी, शिवाजीनगर भागात दुचाकीस्वारांकडून रिक्षाचालकांच्या तक्रारी सतत केल्या जातात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
CCTV | सिग्नलवर वाद, रिक्षाचालकाची दुचाकीस्वाराला धडक; मुंबईतील व्हिडीओ व्हायरल