Andheri Station : अंधेरी स्थानकातील लिफ्टमध्ये अडकलेल्या 18 जणांची सुटका, गरोदर महिला जखमी
Andheri Station : अंधेरी स्थानकावर संध्याकाळी घडलेल्या या घटनेमध्ये एक गरोदर महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकातील (Andheri Station) लिफ्ट अचानक बंद पडल्याची घटना आज संध्याकाळी घडली. लिफ्ट बंद ( Andheri Station Lift Stuck) पडल्यानंतर त्यामध्ये असलेल्या 18 लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश असून ती जखमी झाली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अंधेरी स्थानकातील या घटनेमुळे काही काळ एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र होतं.
मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवर (Andheri Station) असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन मध्ये असलेल्या लिफ्टमध्ये ( Andheri Station Lift Stuck) आज संध्याकाळी 7:30 च्या सुमारास ही घटना घडली. लिफ्ट बंद पडल्यानंतर त्यामध्ये 18 प्रवासी अडकले. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश होता.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि अंधेरी जीआरपी पोलीस तात्काळ या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर तब्बल 15 ते 20 मिनिटांमध्ये लिफ्टचे लॉक तोडून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. पण यामध्ये गरोदर महिला जखमी झाली. या महिलेला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही लिफ्ट काही तांत्रिक बाबींमुळे बंद पडली असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं.
जखमी महिलाला अंधेरी जीआरपी पोलिसांनी कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. संध्याकाळची वेळ असल्याने या स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यातच ही घटना घडल्याने या ठिकाणी लोकांनी एकच गर्दी केली.
लिफ्ट पूर्णपणे बंद
सध्या अंधेरी पोलिसांनी बॅरिकेट लावून ही लिफ्ट पूर्णपणे बंद केली आहे. लिफ्ट पुन्हा रिपेअर केल्यानंतर ती प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार असल्याच्या माहिती अंधेरी जीआरपी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Exam : तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर, 15 आणि 16 ऑक्टोबरला परीक्षा
- Madh Studio : मढ स्टुडिओतील शूटिंगसह सर्व वापर बंद करा अन्यथा कारवाई, मुंबई महापालिकेची नोटीस जारी