Mumbai–Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकाचे काम महापालिकेकडून बंद; कारण काय?
Mumbai-Ahmedabad Bullet Train: महापालिकेने संबंधित यंत्रणेला आवश्यक सुधारणा तात्काळ करण्याचे निर्देश दिले असून, सुधारणा पूर्ण झाल्याशिवाय काम पुन्हा सुरू करता येणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे–कुर्ला संकुल (बीकेसी) येथील स्थानकाच्या बांधकामात वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने संबंधित काम तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
बीकेसी परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे धूळ आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पालिकेच्या तपासणीत नियमांचे उल्लंघन स्पष्ट झाले. आवश्यक धूळ नियंत्रण उपाय, पाण्याचा फवारा, आच्छादन आणि पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
यंत्रणेला आवश्यक सुधारणा तात्काळ करण्याचे निर्देश- (Mumbai-Ahmedabad Bullet Train)
महापालिकेने संबंधित यंत्रणेला आवश्यक सुधारणा तात्काळ करण्याचे निर्देश दिले असून, सुधारणा पूर्ण झाल्याशिवाय काम पुन्हा सुरू करता येणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. नियमांचे पालन न झाल्यास पुढील कडक कारवाई करण्यात येईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
Buldhana News: समृद्धी महामार्गावरील वाहतूक दिनांक 27 ते 29 डिसेंबर दरम्यान बंद राहणार-
समृद्धी महामार्गावरील वाहतूक दिनांक 27 ते 29 डिसेंबर दरम्यान विविध टप्प्यात तात्पुरती बंद राहणार आहे. विविध टप्प्यात हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद असेल. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर "हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम" अंतर्गत "गॅन्ट्री" बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या मार्फत २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. हे काम पाच टप्प्यात होणार असून चॅनेज 104 आणि 80 व चॅनेज 130 ते 300 दरम्यान अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे ते चांदुर रेल्वे तालुक्यातील हे काम आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणाजवळील संबंधित कॉरिडोरवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात येईल.
वाहतूक कधी आणि कुठे बंद ठेवण्यात येईल, पाहा-
1) कि.मी. १०४+०८०, नगर गावंडी (मुंबई कॉरिडॉर) - २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० ते ३.०० किंवा ३.०० ते ४.०० या वेळेत.
2) कि.मी. १०५+०५०, नगर गावंडी (मुंबई कॉरिडॉर ) - २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० ते ३.०० किंवा ३.०० ते ४.०० या वेळेत.
3)कि.मी. १०५+०६५, नगर गावंडी (नागपूर कॉरिडॉर ) - २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० ते ३.०० किंवा ३.०० ते ४.०० या वेळेत.
4)कि.मी. १२०+३००, तिटवा (नागपूर कॉरिडॉर ) -
२९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० किंवा दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत
5) कि.मी. १२०+३००, तिटवा (मुंबई कॉरिडॉर ) - २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० ते ४.०० किंवा ४.०० ते ५.०० या वेळेत























