एक्स्प्लोर
मुंबईत गोवंडीतील 50 टक्के बालकं कुपोषणाच्या विळख्यात
'अपनालय' या आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेच्या रिपोर्टनुसार मुंबईच्या गोवंडीतील चार पैकी दोन बालकं कुपोषित आहेत... 35 % बालकं कमी वजनाची आहेत.
मुंबई : मुंबईची ओळख मायानगरी म्हणून केली जाते. मुंबईची वेगवेगळी रुपं नेहमीच पाहायला मिळतात. पण मुंबई जितकी चांगली, तितकीच वाईट गोष्टींच्या विळख्यातही अडकत जात आहे.
जयेद.. वय वर्ष तीन... नेहमी आजारी असतो... दिवसभर शांत असतो, नाहीतर चिडचिड करतो... त्याला नेमका होतंय काय हे देखील तो सांगू शकत नाही... कारण तो अजून बोलूही शकत नाही... जयेद कुपोषित आहे...
झगमगाट... रोषणाई... श्रीमंती याही पलिकडे मुंबईचा एक दुसरा चेहरा आहे... इथे असेही काही भाग आहेत, जिथे मोठमोठ्या इमारतींच्या पुढे असलेल्या झोपड्याच लोकांसाठी त्यांचा महाल आहेत...
मोठमोठाले रस्ते लहान गल्ल्या होत जातात आणि जिथे सरकारच्या काही योजनासुद्धा साथ सोडून देतात, असाच हा मुंबईमधला "एम वॉर्ड"...
'अपनालय' या आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेच्या रिपोर्ट नुसार या भागातील चार पैकी दोन बालकं कुपोषित आहेत... 35 % बालकं कमी वजनाची आहेत.
या वस्तीतली 35 टक्के कुटुंबं महिन्याला 4 ते 6 हजार रुपयांपर्यंत कमाई करतात.
22 टक्के कुटुंबांचं मासिक उत्पन्न 6 ते 8 हजार रुपयांपर्यंत आहे.
19 टक्के कुटुंबाचं मासिक उत्पन्न 8 ते 10 हजार रुपये आहे.
'अपनालय'च्या 2017 च्या रिपोर्ट नुसार इथल्या महापालिकेच्या शाळेत शिकणारी 50% मुलं कुपोषित आहेत. शहरातील सर्वात कमी म्हणजे 0.5 पेक्षाही कमी मानव विकास निर्देशांक या विभागात नोंदवला गेला आहे. अनेक आफ्रिकन देशांपेक्षा ही परिस्थिती वाईट आहे.
6 लाखांची ही वस्ती... इथे 145 अंगणवाड्या आहेत. सरकारी नियमानुसार दर एक हजार मुलांमागे 1 अंगणवाडी असावी. पण इथल्या 6 लाख लोकसंख्येच्या तुलनेत इथे 600 ऐवजी फक्त 145 अंगणवाड्या आहेत.
या अंगणवाड्यांच्या जागेसाठी सरकारतर्फे फक्त 750 रुपये भाडं मिळतं. त्यामुळे एवढ्या कमी भाड्यात मिळणाऱ्या छोट्याशा खोल्यांमध्ये या अंगणवाड्या भरतात... 30 ते 40 मुलं तिथं दाटीवाटीनं बसलेली असतात.
कुपोषणाचे तीन प्रकार
पहिला प्रकार वेस्टिंग - यात उंचीच्या तुलनेत बालकाचं वजन कमी असतं
दुसरा प्रकार स्टन्टिंग - यात वयाच्या तुलनेत बालकाची उंची कमी असते
तिसरा प्रकार अंडरवेट- यात वयाच्या तुलनेत बालकाचं वजन कमी असतं
5 वर्षाखालील 45 टक्के मुलांचे मृत्यू हे अपुऱ्या पोषणामुळे होतात. कुपोषित बालकांना किमान दान वर्ष योग्य आहार दिल्यास त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होऊ शकते. त्यामुळे मुंबईचा कुपोषित चेहरा बदलायचा असेल, तर त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement