कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर कोविड कचरा नाही, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर कोविड 19 शी संबंधित कचरा कोणतीही जैविक प्रक्रिया न करता टाकला जातोय, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
मुंबई : कल्याणच्या आधारवाडी क्षेपणभूमीवर कोविडशी संबंधित कचरा उघड्यावर टाकला जात नाही. उंबरडे इथं केडीएमसीनं या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारला आहे. तसेच राज्यभरातील 36 जिल्ह्यांत एकूण 30 अशी केंद्र उभारल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली. 1 जुलै रोजी अधिकाऱ्यांनी तिथं अचानक भेट दिली असता तिथं कुठलाही कोविड कचरा आढळला नसल्याची माहिती हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली.
डोंबिवलीचे स्थानिक रहिवासी किशोह सहानी यांनी अॅड. साधना कुमार यांच्यामार्फत ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसाला हजारोंनी वाढत असताना कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर कोविड 19 शी संबंधित कचरा कोणतीही जैविक प्रक्रिया न करता टाकला जातोय. प्रत्यक्षात या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. जेणेकरून आसपासच्या परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र इथं तसं होताना दिसत नाही असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. तेव्हा या आरोपांची शहानिशा करण्यासाठी थोडा वेळ हवा, अशी मागणी प्रशासनाच्यावतीनं करण्यात आली. तेव्हा दोन आठवड्यांत यावर सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करण्यात आलं आहे.
Aslam Sheikh | कंटेनमेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नाही : अस्लम शेख