प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे माय लेकराची भेट, कोपर- दिवा स्थानकादरम्यान झाली होती ताटातूट
Mumbai news : प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे कोपर- दिवा स्थानकादरम्यान ताटातूट झालेल्या माय लेकराची भेट झाली.
मुंबई : एखादी वस्तू हरवली तर आपण केवढे हवालदील होतो. पण व्यक्ती असेल तर? माणसाचं हरवणं खूपच त्रासदायक असतं. मग ते लहान मूल असेलतर त्याहूनही हृदयद्रावक. अशीच एक घटना आज डोंबिवलीजवळी कोपर परिसरात घडली आहे. परंतु, प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे हरवलेल्या आई आणि मुलाची भेट झाली. आज कोपर-दिवा स्टेशन दरम्यान ट्रेन थांबली असताना आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला ट्रेनमधून एका सहप्रवाशाकडे दिले आणि नंतर स्वत: उतरणार तोच ट्रेन सुरू झाली. यावेळी आई आत आणि मुलगा खाली राहिला. मात्र ट्रेन निघून गेली. यावेळी देवदूत बनून आलेल्या सह प्रवाशाने मुलाला कडेवर घेऊन भर उन्हात तासभर रुळावरून चालत आई आणि लहान मुलाची पुन्हा भेट घडवून आणली.
डोंबिवली जवळ कोपर परिसरात हर्षल धनराळे हा तरुण पत्नी अंजू आणि तीन वर्षाचा मुलगा यज्ञेश सोबत राहतो. कलर काम करून हर्षल आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आज हर्षलची पत्नी अंजू आणि मुलगा यज्ञेश हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिवा येथून आपल्या गावी रोहा येथे जाण्यासाठी निघाले. मात्र अंजू चुकून पनवेल ऐवजी वसईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्या. गाडी सुरू झाल्यावर आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे कोपर स्थानकात उतरण्यासाठी त्या दरवाजात थांबल्या होत्या. मात्र ही ट्रेन दिवा ते अप्पर कोपर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सिग्नलवर थांबताच अंजू यांनी मुलासह खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला उतरता आले नाही. यावेळी सह प्रवासी प्रणित जंगम याला मुलाला खाली उतरून दे अशी विनंती तिने केली. प्रणित तीन वर्षाच्या यज्ञेश ला घेऊन खाली उतरला. मात्र इतक्यात ट्रेन सुरू झाली. यामुळे अंजू गाडीतून उतरू शकली नाही.
आपला मुलगा एका अज्ञात व्यक्कितसोबत एकटाच आहे, तो हरवणार तर नाही ना या कल्पनेने अंजू कासावीस झाल्या. त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने कुटुंबाला आणि रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. इतर प्रवाशांनी अंजूला अप्पर कोपर रेल्वे स्टेशनवर उतरवले. आणि धावतच मुलाचा शोध घेण्यासाठी पुन्हा दिवा गाठले. मात्र तोपर्यंत प्रणित मुलाला घेऊन रेल्वे रुळातून तासभर चालत कोपर रेल्वे स्टेशनला पोचला. त्याने रेल्वे पोलिसांसह स्टेशन मास्तरकडे जात घडलेली घटना सांगितली. स्टेशन मास्तरांनी आजूबाजूच्या स्थानकात संपर्क करत ही माहिती दिली. काही वेळातच अंजू आणि तिचे कुटुंबीय कोपर रेल्वे स्टेशनला आले. आपल्या चिमुकल्याला पाहून अंजूचे डोळे पाणावले. तिने मुलाला मिठीत घेत तिच्यासाठी देवदूत ठरलेला प्रणितचे आभार मानले. प्रणितने दाखवलेली सतर्कता आणि प्रसंगावधान यामुळेच ताटातूट झालेल्या माई लेकाची भेट झाली.
प्रणित हा नालासोपारा येथे राहात असून एका कुरिअर कंपनीमध्ये तो नोकरी करतो. दुपारी वसई ट्रेनने कोपर येथे येणार होता. मात्र त्याला झोप लागल्याने तो दिवा येथे पोहचला. त्यानंतर पुन्हा त्याच ट्रेनने तो कोपरला जाण्यासाठी निघाला. याच दरम्यान ही घटना घडल्याचे तो सांगतो.