ठाण्यातील मनसे नेत्याची हत्या करणाऱ्या शूटरला लखनौमध्ये युपी पोलिसांची अटक
ठाण्यात मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची भररस्त्यात डोक्यात गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनौमध्ये अटक केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी जमिल शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 रोजी राबोडी येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. राबोडी येथे जमिल शेख जेव्हा बाईकवरून जात होते तेव्हा मागून त्यांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या होत्या.
ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून हत्या
जमिल शेखला मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे नगरसेवक नजीबुल्लाहने सुपारी दिली होती, असा दावा यूपी एसटीएफने शुटर इरफानच्या अटके नंतर केला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जमिल शेख मनसे पक्षाचे पदाधिकारी असून एक आरटीआय कार्यकर्ताही होते. ते वारंवार नजीबुल्लाह विरोधात तक्रार करत होते. जमीनीच्या व्यवहारामुळे ही हत्या करण्यात आली अशी माहीती यूपी एसटीएफने त्यांच्या प्रेसनोटमध्ये दिली आहे. तर मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया नजीबुल्लाह यांनी दिली आहे.
#UPSTF
— UPSTF (@uppstf) April 3, 2021
के द्वारा दिनांक 03-04-2021 को मनसे नेता एवं आर0टी0आई0 कार्यकर्ता जमील अहमद शेख पुत्र अब्दुल रब की दिनांक 23-11-2020 को थाणे महाराष्ट्र में हत्या कर सनसनी फैलाने वाले अपराधी इरफान पुत्र सोनू को थाना विभूतिखण्ड क्षेत्र, कमिश्नरेट लखनऊ से गिरफ्तार किया गया।@uppolice pic.twitter.com/1Ex9k57sDO
ही हत्या करणारा शूटर इरफान सोनु शेखला उत्तर प्रदेशच्या एसटीएस टीम ने 3 एप्रिल रोजी लखनौ येथील कठोता परिसरातून अटक केलं. ठाणे क्राईम ब्रांचला इरफान हा उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे त्याला अटक करण्यास मदत मागितली होती. ज्यानंतर उत्तर प्रदेश एसटीएफने एक टीम बनवली आणि इरफानचा शोध सुरू केला. एसटीएफ टीमला माहिती मिळाली की 3 एप्रिल रोजी इरफान लखनौ येथील कठोता येथे येणार आहे. तिथे एका व्यक्तीला भेटून तो कुठेतरी पळून जाणार आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश एसटीएफ टीमने सापळा रचला आणि इरफानला अटक केली.
उत्तर प्रदेश एसटीएफने केलेल्या चौकशीमध्ये इरफानने सांगितलं की 23 नोव्हेंबर रोजी ओसामाने त्याला आणि शाहिदला त्याच्या रूमवर बोलावलं आणि आजच हत्या करायची आहे असं सांगितलं. ज्यानंतर शाहिदच्या गाडीमध्ये इरफान आणि शाहिदने कपडे बदलले आणि ओसामाची मोटर सायकल घेऊन राबोडी मस्जिदला पोहचले. जमिल शेख जेव्हा मज्जिद मधून बाहेर पडला तेव्हा शाहिद आणि इरफान मोटरसायकलवर त्याचा पाठलाग करू लागले, ओसामासुद्धा दुसर्या बाईकवर त्यांच्या आसपास होता. शाहिद बाईक चालवत होता तर इरफान पाठी बंदूक घेऊन बसला होता. थोडं पुढे जाताच इरफानने मागून जमिल शेखच्या डोक्यात गोळ्या झाडल्या ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही हत्या करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीबुल्लाहने सुपारी दिली होती, असा दावा यूपी एसटीएफने केला आहे. यूपी एसटीएफला ही माहिती शूटर इरफानने अटकेनंतर दिली, असं यूपी पोलीस म्हणत आहेत. या सुपारीसाठी दहा लाख रुपये रक्कम निश्चित करण्यात आली होती. यातील दोन लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते, असंही यूपी एसटीएफने म्हटले आहे.
इरफान ट्रान्झिट रिमांड घेऊन ठाणे पोलीस त्याला महाराष्ट्रात दाखल होणार असून या प्रकरणात पुढील तपास करण्यात येणार आहे. ठाणे पोलिसांचं म्हणणं आहे की इरफानला ठाण्यात आणल्यानंतर तपास केला जाईल. फरार आरोपींनाही लवकर पकडलं जाईल आणि तपासमध्ये ज्या कोणाची नावे समोर येतील, पुरावे मिळतील त्यांना निश्चित अटक केली जाईल.