राज ठाकरे आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारींची भेट घेणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. सात ते आठ गाड्यांच्या ताफ्यासह राज ठाकरे सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या सुमारास 'कृष्णकुंज' या आपल्या निवासस्थानाहून राजभवनाच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर ते सव्वादहाच्या सुमारात राजभवनात पोहोचले. राज ठाकरे यांच्यासह पुत्र अमित ठाकरे आणि शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहेत.
राज ठाकरे अकरावी प्रवेश, वाढीव वीजबिल, दूध उत्पादकांसाठी दरवाढ आणि मंदिरांबाबत राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसात जिम मालक, ग्रंथालयाचे प्रतिनिधी, मुंबईचे डबेवाले, त्र्यंबकेश्वरचे पुजारी, ज्येष्ठ नागरिक, कोळी महिला, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, महिला बचत गट अशा अनेकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची विनवणी केली होती. आता यासह विविध मुद्द्यांवर राज ठाकरे राज्यपालांची भेट घेत आहेत.
बंद मंदिरावरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्रवाद झाला होता. गेल्या काही दिवसांत अनेकांनी सरकारविरोधी गाऱ्हाणं घेऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यामुळे आज होणाऱ्या राज ठाकरे आणि राज्यपालांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.