एक्स्प्लोर
मुंबईतील हजारो कोळी बांधवांना बेघर करण्याचं भाजप सरकारचं षडयंत्र : कॉंग्रेसचा आरोप
निवडणूक संपताच इथल्या लोकांना हलवण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनीही इथे बीपीटीच्या कार्यक्रमात कुणालाही हलवलं जाणार नाही असं आश्वासन दिलं होतं, मात्र दुसर्या दिवशी बीपीटीमधील इमारतींना नोटीस दिल्या असल्याचे जगताप म्हणाले.

मुंबई : दक्षिण मुंबईतील हजारो कोळी बांधवांना बेघर करण्याचे केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केला आहे. सुंदर नगर, आझाद नगर, गीता नगर गावठाणातील रहिवाशांना इथून हलवण्याचा डाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे कोळी बांधव या गावठाणावर राहात आहेत. नौदल विभागाला इथल्या झोपडपट्टीमुळे धोका असल्याची शंका निर्माण करून त्यांना इथून हलवण्याचे प्रयत्न आहेत, असा आरोपही जगताप यांनी केला आहे. स्थानिक मच्छिमार, कोळी बांधव आणि त्यांच्या सोसायट्यांना विश्वासात न घेता या भागात बायोमेट्रिक नोंदणी सुरू असल्याचा आरोप देखील भाई जगताप यांनी केला आहे. निवडणुकीच्या आधी मात्र इथल्या नागरिकांची मतं घेण्यासाठी इथल्या घरांना हात लावू देणार नाही असं आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणूक संपताच इथल्या लोकांना हलवण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनीही इथे बीपीटीच्या कार्यक्रमात कुणालाही हलवलं जाणार नाही असं आश्वासन दिलं होतं, मात्र दुसर्या दिवशी बीपीटीमधील इमारतींना नोटीस दिल्या असल्याचे जगताप म्हणाले. कुलाब्यामधील गीतानागर, सुंदर नगरी, आझाद नागरी हे नेवलच्या जमिनीत वसले आहे आणि त्यांच्या शिफ्टिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र नेवल बेस हे नंतर आलं आहे, आधीपासूनच कोळी बांधव इथे राहत होते. मात्र आता या झोपडपट्टीमुळे नौदलाला धोका निर्माण होऊ शकतो अशी शंका निर्माण केली जातेय. हे भाजप शिवसेनेकडून केलं गेलंय असा आमचा आरोप आहे, असे भाई जगताप म्हणाले. महाराष्ट्र सरकार 2000 पर्यंतच्या सर्व झोपड्यांना संरक्षण देणार असं सांगत आहे, पण आता या नागरिकांच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक संपताच नेवल प्रशासनासह सर्व प्रशासन जागे झाले आणि येथील नागरिकांच्या घराविषयी प्रश्न उपस्थित केला जातोय. सरकारने असं केलं तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असंही ते म्हणाले. या भागात मोठ्या इमारती आहेत त्यांना सरकार काही करत नाही, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई























