एका फोनमुळे मोठी दुर्घटना टळली : जयंत पाटील
सिद्धेश पवार नावाचा तरुण बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जण बसल्याने आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा दावा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.
मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला निघालेल्या बोटीला अपघात झाला आहे. खडकावर आपटून झालेल्या या अपघातात बोटीवरील एक तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धेश पवार नावाचा तरुण बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जण बसल्याने आणि नियोजनाच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचा दावा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.
अपघातानंतर बोटीवरुन सव्वाचारच्या सुमारास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पीए श्रीनिवास जाधव यांचा फोन आला होता. आम्ही बुडतो आहोत आम्हाला तातडीने बोट पाठवा असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर मी तातडीने गेट वे ऑफ इंडियाजवळ उभ्या असलेल्या दोन बोटी घटनास्थळी पाठवल्या आणि पाच मिनिटातच त्या बोटी घटनास्थळी पोहोचल्या, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम नियोजित असल्याने त्याठिकाणी शासकीय अधिकारी, अभियंते, शिवप्रेमी, कार्यकर्ते येणार याचा अंदाज आयोजकांना येणे गरजेचे होते. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने योग्य उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र केवळ निष्काळजीपणामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचा आरोप जयतं पाटलांनी केला आहे.
समुद्रामध्ये फायबरची बोट घेऊन जाणं चुकीचं होतं. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने हा अपघात घडला. तातडीने मदत याठिकाणी पोहोचणे आवश्यक होते, तसं झालं नाही, असा आरोपही जयंत पाटलांनी केला.
बोटीचा चालक शिकाऊ असल्याचा अंदाजही जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. समुद्रातील दीपस्तंभाजवळील भाग खडकाळ असतो. त्यामुळे तेथे बोट घेऊन जाणं हे धोकादायक असतं, हे बोट चालकाला माहीत असणे आवश्यक आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला अनेक व्हीआयपी व्यक्ती जात असताना सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक होते. महाराष्ट्र शासनाच्या अनेक अद्ययावत बोटी आहेत. त्याचा वापर का केला नाही, असा सवालही जयंत पाटलांनी उपस्थित केला. श्रीनिवास जाधव यांच्या एका फोनमुळे बोटीवरील सर्वांचे प्राण वाचले, याबद्दल जयंत पाटलांनी श्रीनिवास जाधवांचे आभार मानले.
कसा घडला अपघात?
मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाली. या बोटीवर असलेले शिवसंग्रामचे 18 ते 20 कार्यकर्ते सुखरुप आहेत, तर सिद्धेश पवार हा कार्यकर्ता बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली आहे. अपघातानंतर पायाभरणी कार्यक्रम रद्द करण्यात आला.
गिरगाव चौपाटीजवळ अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला जाणारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची स्पीडबोट दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला. अपघातानंतर बोट समुद्रात बुडाली.
अपघातावेळी स्पीड बोटमध्ये असलेल्या व्यक्तींना वेळीच बाहेर काढल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. दुसरी बोट घटनास्थळी गेल्यानंतर बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांची तातडीने सुटका करण्यात आली.
शिवस्मारकाची पायाभरणी
एल अँड टी अर्थात लार्सेन आणि टुब्रो कंपनीकडून प्रत्यक्षात समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार होती. पुढच्या 36 महिन्यांत अर्थात तीन वर्षात काम पूर्ण करण्याचं ध्येय ठेवून हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वोच्च स्मारक असा या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा लौकीक असणार आहे.
आघाडीच्या सरकारच्या काळात हे स्मारक घोषित झाले. या स्मारकासाठी भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक परवानग्या दोन वर्षांत मिळाल्या. तसेच या स्मारकाचे जलपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अरबी समुद्रात 15 हेक्टरच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार असून पहिल्या टप्प्याच्या कामाचा खर्च राज्य सरकारने अंदाजे अडीच हजार कोटी रुपये निश्चित केला आहे.
या शिवस्मारकात काय असणार?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचं जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. या स्मारकातील मुख्य आकर्षण असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.
पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल. शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल.
समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखवण्यासाठी दालन, वस्तूसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे.
स्मारकाची जागा राजभवनापासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.6 कि.मी अंतरावर आहे. स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी 325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.
संबंधित बातम्या