रिक्षाचालकाचं प्रसंगावधान, रागाच्या भरात दिल्ली सोडून वसई गाठलेल्या अल्पवयीन मुलीची पुन्हा वडिलांशी भेट
रागाच्या भरात दिल्लीहून वसईला आलेल्या एका अल्पवयीन मुलीला पोलिसांच्या मदतीने पुन्हा तिच्या वडिलांकडे सोपवण्यात आलं आहे.
वसई : एका रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानाने दिल्लीतून आपलं घर सोडून, वसईत आलेल्या एका अल्पवयीन मुलीला पोलिसांच्या मदतीने पुन्हा तिच्या वडिलांकडे सोपवण्यात आलं आहे. संबधित मुलगी दिल्लीची असून, तेथील पोलीस स्टेशनमध्ये तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. वडिलांनी तिला 'क्लास का अटेंड केलं नाहीस?' याबाबत विचारणा केल्यामुळे रागाच्या भरात मुलीने घरं सोडलं होतं. पण वसईत कामाच्या शोधात फिरत असताना राजू करवाडे या रिक्षाचालकाने तिला योग्यरित्या पोलिसांच्या मदतीने तिच्या वडिलांपर्यंत पोहोचवलं.
संबधित घटना शनिवार (29 जानेवारी) रोजीची आहे. सकाळी सहाच्या सुमारास वसईच्या रेल्वे स्थानकाजळच्या रिक्षा स्टॅंड परिसरात एक 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी फिरत होती. तिने रिक्षाचालक राजू याला आपणाला नोकरी पाहिजे आणि घरही पाहिजे असं सांगितलं. या मोठ्या शहरात कुठल्या गुन्हे प्रवृत्तीच्या इसमाला ही मुलगी भेटली तर तिच आयुष्य खराब होईल. हे ओळखून राजू याने प्रसंगावधान दाखवत तिला थेट माणिकपूर पोलीस ठाण्यात नेलं. तेथे ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी ही सहकार्य करत मुलीची विचारपूस करुन, तिच्या वडिलांचा मोबाईल नंबर घेत त्यांना कळवलं. त्यानंतर मुलीला तिच्या वडिलांकडे सोपवण्यात आलं.
क्षुल्लक कारणावरुन सोडलं घर
संबधित मुलगी ही दिल्लीची राहणारी होती. तिला वडिलांनी शिकवणीला गेली नाहीस याबाबत विचारणा केली आणि मुलीने या कारणावरुन रागाच्या भरात घरात कोणालाही न सांगता घर सोडलं. मुलीच्या अपहरणाची तक्रार वडिलांनी दिल्लीच्या साकेत पोलीस ठाण्यात केली होती. पण मुलगी दिल्लीहून थेट वसईला आली. पण सुदैवाने तिची भेट राजू या रिक्षाचालकाशी झाली आणि ती सुखरुपरित्या पुन्हा वडिलांना भेटली.
रिक्षाचालकाचा सत्कार
संबधित मुलीचे वडिल सैन्यात अधिकारी पदावर आहेत. देशाच संरक्षण करणाऱ्या एका जवानाच्या मुलीचं संरक्षण केल्याचा अभिमान असल्याचं राजू याने सांगितलं. दरम्यान यानंतर राजू याचा सत्कार ही करण्यात आला.
हे ही वाचा -
- Kalyan Crime : प्रवाशांच्या सतर्कतेमुळे 5 लुटारू गजाआड; चोरट्यांमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश
- फेक अकाऊंट बनवून मुलीचे अश्लील फोटो काढले, मग केली शरीरसुखाची मागणी; वसई पोलिसांनी चतुराईनं भामट्याला पकडलं
- Pune: पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, 72 तासांत विनयभंग करणाऱ्या आरोपीला सुनावली शिक्षा; हिंजवडी पोलिसांचीही मोठी कामगिरी