तलवार कुणा विरोधात उपसणार? मंत्री विजय वडेट्टीवार यांचा संभाजीराजे यांना सवाल
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. एमपीएससी (MPSC) परीक्षा रद्द करण्याची मागणी मराठा संघटना करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार? ओबीसी विरोधात, दलित विरोधात? तलवारीची भाषा का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला आहे. तडजोडीची भाषा असली पाहिजे. एमपीएससी परीक्षेत 200 जागा आहेत. त्यात 23 जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. पण त्यात कोणत्याही समाजाचे (मराठा समाज) नुकसान व्हावं अस नाही. म्हणून राजांना सांगतो मध्य मार्ग काढता येतो. हे राजकारण कशाला? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत. एक समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये, असेही वडेट्टीवार शेवटी म्हणाले.
Maratha Reservation | गरज पडेल तेव्हा तलवारी काढू : संभाजीराजे
काय म्हणाले संभाजीराजे? संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही संभाजीराजे म्हणाले. तसंच येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनाला संभाजीराजेंनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते.
"1902 मध्ये शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण दिले त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे गरजेचं आहे. 80 टक्के मराठा समाज गरीब आहे. आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार," असं संभाजीराजे म्हणाले.
MPSC Exam | MPSC परीक्षा पुढं ढकला, सरकारनं मराठा समाजाची परीक्षा पाहू नये- खासदार उदयनराजे