MHADA Lottery 2022 : प्रतीक्षा संपली! दिवाळीत मुंबईतील म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी; अधिकृत घोषणा लवकरच
MHADA Lottery 2022 : मुंबईतील म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून दिवाळीत चार हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार.
MHADA Lottery 2022 : मुंबईत (Mumbai) घरं घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सर्वात मोठा आधार म्हणजे म्हाडा (MHADA). मात्र गेल्या तीन वर्षांत म्हाडानं मुंबईतल्या घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery) काढली नाही. मात्र ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण दिवाळीत मुंबईमध्ये चार हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडानं तयारी सुरु केली आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. त्यामुळे तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी आणि कोळे-कल्याण या ठिकाणी ही घरं असतील. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करू नये, असा निर्णय म्हाडानं घेतला होता. मात्र, आता चालू प्रकल्पातील येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल अशा घरांचा सोडतीत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
दिवाळीत मुंबईमध्ये सुमारे चार हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. मुंबई मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतल्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळं या शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांना धूसर वाटतं. पण म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेत सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होऊ शकतं.
काही दिवसांपूर्वी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसंदर्भात घोषणा केली होती. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल, असं सांगितलं होतं. एका वृत्तपत्राशी बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिवाळीत मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दिली.
पाहा व्हिडीओ : दिवाळीत मुंबईमध्ये चार हजार घरांची लॉटरी
दिवाळीच्या दीड-दोन महिन्यांआधी जाहिरात प्रसिद्ध करून प्रत्यक्ष सोडत काढण्यात येईल. या सोडतीत पहाडी, गोरेगाव येथील तीन हजार 015 घरांपैकी अल्प आणि अत्यल्प गटातील दोन हजार 683 घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच कोळे-कल्याण, अॅन्टॉप हिल, विक्रोळी आदी ठिकाणच्या घरांचाही समावेश असणार आहे.
काही दिवसांपूर्वी बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करू नये, असा निर्णय म्हाडानं घेतला होता. पण आता चालू प्रकल्पातील म्हणजेच, येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल, अशा घरांचा सोडतीत समावेश केला जाणार आहे.