(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MHADA : गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडाची 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
MHADA Lottery Campaign : यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडातर्फे विशेष मोहीम सुरू आहे.
मुंबई : बृहन्मुंबईतील 58 बंद, आजारी गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत आणि यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार तसेच त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडातर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला दिनांक 15 फेब्रुवारी, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही
गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 14 सप्टेंबर, 2023 पासून राबविण्यात येणार्या या विशेष अभियानामध्ये गिरणी कामगारांची कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता म्हाडातर्फे ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
या ठिकाणी अर्ज उपलब्ध
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केल्याबाबतची कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने मुंबईतील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळील समाज मंदिर हॉल येथे सादर करावीत. ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी Mill workers eligibility हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून सदर ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण 1,04,960 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 81,825 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/ अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.
संपर्कासाठी फोन नंबर
यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता 9711194191या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
आवश्यक कागदपत्रे
मंडळातर्फे सर्व संबंधित गिरणी कामगार व वारसांना आवाहन करण्यात येत आहे की, पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या 13 पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र , लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. सदरील अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.