ठाण्यात सासऱ्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक
कळवा पोलिसांनी याप्रकरणी पूनमचा पती बबलू सिंह चौहानला अटक केली असून सासरा रविंद्र सिंह चौहान याचा शोध पोलीस घेत आहेत.
ठाणे : सासऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यामध्ये समोर आला आहे. घरात लहान मुलगी असल्याने पीडित महिला सासऱ्याला दारु प्यायला विरोध करत असे. यावरुन सासरा तिला रोज मारायचा. या रोजच्या त्रासाला वैतागून अखेर महिलेने स्वतःला पेटवून घेतलं.
पूनम चौहान असं मृत महिलेचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पूनमने वडिलांना कशा प्रकारे आपल्याला त्रास होत आहे, सर्व प्रकार सांगितला. पूनमच्या या अवस्थेला तिचा सासरा जबाबदार आहे. घरात 3 वर्षाचे बाळ असल्याने घरात दारु पिऊ नका असं पूनम तिच्या सारऱ्याला सांगायची. मात्र विरोध केल्याने सासरा तिला मारहाण करायचा. प्रचंड मारहाण करूनही तो घरीच दारु पित बसायचा. 31 मे रोजी रात्री देखील असंच घडलं, पण मारहाण असह्य झाल्याने पूनमने शेवटी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.आजूबाजूच्या लोकांना ही घटना कळताच त्यांनी पूनमला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथून तिला सावरकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिची जगण्याची झुंज अपुरी पडली. धक्कादायक म्हणजे पूनमच्या पतीसमोर हा सर्व प्रकार घडत होता, पण त्याने केवळ बघ्याची भूमिका घेतली.
कळवा पोलिसांनी याप्रकरणी पूनमचा पती बबलू सिंह चौहानला अटक केली असून सासरा रविंद्र सिंह चौहान याचा शोध पोलीस घेत आहेत. घटना घडली त्या दिवसापासून तो फरार आहे. त्याला लवकरच अटक करु असं पोलिसांनी आश्वासन दिलं आहे.